मोरारी बापूंच्या रामकथेला ऋषी सुनक यांंची उपस्थिती; म्हणाले, ‘मी पंतप्रधान नाही तर हिंदू म्हणून आलो आहे’!

  ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक (Rishi Sunak)  यांनी मंगळवारी अध्यात्मिक गुरू मोरारी बापूंच्या रामकथेला (Morari Bapu Ramkatha) हजेरी लावली. केंब्रिज विद्यापीठात (Cambridge University) मोरारी बापूंची रामकथा होत आहे. यावेळी ऋषी सुनक यांनीही मोरारी बापूंच्या व्यासपीठावर ‘जय सियाराम’चा जयघोष करत पुष्पहार अर्पण केला. ‘मी पंतप्रधान म्हणून नाही, तर हिंदू म्हणून सामील झालो आहोत.’ असं ते यावेळी म्हणाले.

  काय म्हणाले ऋषी सुनक?

  मोरारी बापूंची रामकथा ऐकण्यासाठी आलेले ऋषी सुनक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मोरारी बापूंच्या रामकथेला उपस्थित राहणे ही सन्मानाची आणि आनंदाची बाब आहे. ते म्हणाले की, मी पंतप्रधान म्हणून नाही, तर हिंदू म्हणून सामील झालो आहोत. तसेच, ‘विश्वास ही माझ्यासाठी अत्यंत वैयक्तिक बाब आहे. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक पैलूत ते मला मार्गदर्शन करते. पंतप्रधान होणे हा मोठा सन्मान आहे, पण ते सोपे काम नाही. कठीण निर्णय घ्यावे लागतात. आणि आमचा विश्वास मला माझ्या देशासाठी सर्वोत्तम करण्यासाठी धैर्य आणि शक्ती देतो.’

  माझ्या डेस्कवर गणेशाची मूर्ती – ऋषी सुनक

  ऋषी सुनक यांनी मुरारी बापूंना सांगितले की, तुमच्या व्यासपीठावर जसे सोनेरी हनुमानजींचे चित्र आहे, त्याचप्रमाणे 11 डाऊनिंग स्ट्रीटमध्ये मी माझ्या डेस्कवर गणेशाची मूर्ती ठेवतो आणि मला त्याचा अभिमान आहे. ते म्हणाले, ‘बापू, तुमच्या आशीर्वादाने, आमच्या शास्त्रांनी नेत्यासाठी जे सांगितले आहे ते मी करण्याचा प्रयत्न करतो. तुमची उर्जा मला प्रेरणा देते. गेल्या आठवड्यात तुम्ही भारतातील 12 ज्योतिर्लिंगांना भेट दिली आणि रामकथा केली आणि त्यासाठी 12000 किलोमीटरचा प्रवास केला. त्या प्रवासात मी सुद्धा तिथे हजर असतो असे मला वाटत राहिले.

  मोरारी बापूने केलं ध्वजारोहण

  केंब्रिज विद्यापीठात मोरारी बापूंच्या रामकथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मोरारी बापू यांनी मंगळवारी सकाळी अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमात कॅम्ब्रिज विद्यापीठात भारतीय स्वतंत्रता दिवसाच्या औचित्यावर ध्वजारोहण केलं. पंतप्रधान ऋषी सुनक यांनी मोरारी बापूंना शाल देऊन त्याचं अभिवादन केलं. तर, त्यानंतर मोरारी बापूंनीही सुनक यांचं शाल घालून त्यांचे स्वागत केले. मोरारी बापूंनी सुनक यांना शिवलिंगही भेट दिलं.