संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीत भारताला कायम सदस्यत्व मिळावे : जयशंकर

सुरक्षा समितीमध्ये सध्या पाच कायमस्वरुपी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य असलेले देश कोणत्याही मुद्द्यावर व्हेटो अधिकार वापरू शकतात. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार इतरही देशांना या समितीत स्थान मिळणे आवश्‍यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.

    न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा समितीमध्ये (United Nations Security Committee) भारत (India) नसणे हे या जागतिक संस्थेसाठी योग्य नाही. या समितीच्या रचनेत सुधारणा आवश्‍यक असून त्यासाठी प्रचंड विलंब झाला आहे, असे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी सांगितले. या समितीमध्ये भारताला कायमस्वरुपी सदस्यत्व (Permanent Membership) मिळावे, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत, असेही जयशंकर यांनी सांगितले. संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेसाठी (General Assembly Of UNO) जयशंकर हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत.

    कोलंबिया विद्यापीठातील एका कार्यक्रमात त्यांनी सहभाग घेतला होता. यावेळी जयशंकर म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांच्या रचनेत सुधारणा करण्याच्या मागणीत भारत आघाडीवर आहे. बदलत्या राजकीय आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीमुळे ही सुधारणा अत्यावश्‍यक असून ती अनेक वर्षे आधीच होणे अपेक्षित होते. सुरक्षा समितीचा कायमस्वरुपी सदस्य होण्यास भारत अत्यंत पात्र देश आहे.

    सुरक्षा समितीमध्ये सध्या पाच कायमस्वरुपी आणि १० अस्थायी सदस्य देश आहेत. अमेरिका, चीन, रशिया, ब्रिटन आणि फ्रान्स हे पाच कायमस्वरुपी सदस्य असलेले देश कोणत्याही मुद्द्यावर व्हेटो अधिकार वापरू शकतात. बदलत्या जागतिक परिस्थितीनुसार इतरही देशांना या समितीत स्थान मिळणे आवश्‍यक आहे, अशी भारताची भूमिका आहे.

    भारत हा महत्त्वाचा देश : ब्रिटन
    जागतिक राजकारणात भारत हा अत्यंत महत्त्वाचा देश असून भौगोलिक आकार, अर्थव्यवस्था आणि इतर देशांवर असलेला प्रभाव पाहता या देशाने अधिक मोठी भूमिका निभावल्यास ब्रिटनचा त्यांना पाठिंबा असेल, असे ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री जेम्स क्वेव्हरी यांनी आज आमसभेत बोलताना सांगितले. सुरक्षा समितीच्या कायमस्वरुपी सदस्यत्वासाठी त्यांनी भारताला पाठिंबाही व्यक्त केला.