दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचार करणारे भारतीय उद्योगपती अटकेत

    दक्षिण आफ्रिकेत भ्रष्टाचाराचे आरोप असलेले भारतीय उद्योगपती गुप्ता ब्रदर्स (Gupta Brothers) यांना संयुक्त अरब अमिरातीमध्ये (United Arab Emirates) अटक करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिका सरकारने सांगितले की, संयुक्त अरब अमिरातमधील (UAE) कायद्याची अंमलबजावणी करणार्‍या अधिकार्‍यांनी गुप्ता कुटुंबातील राजेश गुप्ता (Rajesh Gupta) आणि अतुल गुप्ता (Atul Gupta) यांना अटक केली. या दोघांविरुद्ध इंटरपोलने रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती. सध्या दक्षिण आफ्रिकेचे सरकार दोघांच्याही प्रत्यार्पणासाठी प्रयत्न करत आहे.

    गुप्ता बंधू २४ वर्षांपूर्वी सहारनपूरहून व्यवसायाच्या शोधात दक्षिण आफ्रिकेत गेले होते. तिथे त्यांनी चांगला जम बसवला होता. त्यानंतर ते देशातील पहिल्या दहा श्रीमंत व्यावसायिक कुटुंबांपैकी एक बनले. पण, माजी राष्ट्रपती झुमा यांच्या जवळ असल्याचा आणि राजकीय फायद्यासाठी त्यांचा व्यवसाय चालवल्याचा आरोप त्यांच्यावर होत होता.

    गुप्ता ब्रदर्सच्या मालकीचे ‘द न्यू एज’ हे वृत्तपत्र आहे. या वृत्तपत्राने सरकारी मालकीच्या उद्योगांमधून कोट्यवधी रुपये लाटले होते. शिवाय, माजी राष्ट्रपती जेकब झुमा यांचीही मदत केली होती, असा आरोपही त्यांच्यावर आहे. मूळचे उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) सहारनपूर येथील अजय, अतुल आणि राजेश या तीन गुप्ता बंधूंनी टीएनए सुरू केला, मात्र ते आता बंद आहे. हे तिघे भाऊ सध्या दुबईत राहत होते.