मोदी गेल्यानंतरच भारत-पाक संबंध सुधारतील; पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे वक्तव्य

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान अजूनही भारतासोबतच्या संबंधांबाबत कन्फ्यूज असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. भारतातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पायउतार झाल्यानंतरच दोन्ही देशांतील संबंध सुधारतील, असे इम्रान खान यांनी एका मुलाखतीदरम्यान म्हटले आहे. याआधी, 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत त्यांनी मोदी विजयी झाल्यास दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते, असे म्हटले होते.

    … तर तोडगा काढला असता

    पाकिस्तानने भारतासोबत चांगले संबंध ठेवण्यासाठी नेहमीच प्रयत्न केला आहे. भारतात आरएसएसची विचारसरणी विचित्र आहे. या विचारसरणीसोबत पंतप्रधान मोदी यांचा संबंध आहे. भारतात इतर नेतृत्व असते तर, दोन्ही देशांचे अधिक चांगले संबंध असते. इतर सरकारसोबत आम्ही सर्व राजकीय मतभेदांवर तोडगा काढला असता असे इम्रान खान म्हणाले.

    भारतातून मोदी सरकार पायउतार झाल्यास दोन्ही देशांमधील संबंध सुधारू शकतात. इतर देशांच्या तुलनेत मला भारताकडून अधिक मान सन्मान मिळाला आहे. त्यामुळे इतर पाकिस्तानी नेत्यांपेक्षा आपण भारताला अधिक चांगले ओळखतो. पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदा नरेंद्र मोदी यांना संपर्क केला. पाकिस्तानमधील गरिबी दूर करण्यासाठी त्यांच्यासोबत चर्चा झाली. त्यावेळी मोदी यांनी गरिबी दूर करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चांगले व्यापार संबंध असावे आणि त्याचा फायदा दोन्ही देशांना होणार असल्याचे सांगितले, असे खान यांनी म्हटले.

    उल्लेखनीय आहे की, 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींचे तोंडभरून कौतुक केले होते. भाजपचा विजय झाल्यास आणि नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास शांतता वार्ता अधिक जोमाने सुरू होऊ शकते. भाजप उजव्या विचारसरणीचा पक्ष आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विजय झाल्यास काश्मीर मुद्यावर तोडगा निघू शकतो, असे इम्रान यांनी म्हटले होते.