इंडोनेशिया भूकंप; बळींची संख्या २६८ वर, अद्याप १५१ जण बेपत्ता

जावा बेटाला बसलेल्या ५.६ रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपामुळे एक हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका चिआंजूर शहराला बसला आहे. या ठिकाणी अनेक बचावपथके दाखल झाली असून ढिगारे हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    जकार्ता – इंडोनेशियातील (Indonesia) जावा बेटावर सोमवारी भूकंपाचे (Earthquake) धक्के बसले. यामध्ये मृतांची संख्या आता २६८ वर पोहोचली आहे. भूकंपामुळे अनेक इमारती कोसळल्या (Buildings Collapse) असून बचाव आणि मदत कार्याला वेग आला. अद्याप १५१ जण बेपत्ता असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे.

    जावा बेटाला (Java Island) बसलेल्या ५.६ रिश्‍टर तीव्रतेच्या भूकंपामुळे एक हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. भूकंपाचा सर्वाधिक फटका चिआंजूर (Cianjur) शहराला बसला आहे. या ठिकाणी अनेक बचावपथके दाखल झाली असून ढिगारे हटविण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकले असण्याची शक्यता असल्याने मृतांची आणि जखमींची संख्या वाढू शकते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

    भूकंपानंतर येथील एका शाळेची इमारतही कोसळल्याने मृतांमध्ये विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे त्यांना सरकारने आर्थिक मदतही जाहीर केली आहे. भूकंपामुळे हादऱ्यांमुळे काही ठिकाणी दरडीही कोसळल्याने रस्ते बंद झाले आहेत. अनेक दुर्गम भागांमध्ये अद्यापही मदत पोहोचलेली नाही. जखमींची संख्या मोठी असल्याने येथील सर्व रुग्णालये भरली आहेत. रुग्णालयांच्या बाहेरच अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. भूकंपामुळे हजारो नागरिक बेघर झाले आहेत. त्यांच्यासाठी सरकारने मदत छावण्या उभारण्यात आल्या असून आवश्‍यक कपडे, पांघरूण, खाद्यपदार्थ, पाणी यांचा पुरवठा त्यांना केला जात आहे.