भारत कॅनडा मध्येच आधीच तणाव, आता खलिस्तान्यांनी हिंदूंना तातडीने कॅनडा सोडण्यास सांगितलं!

खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरून भारत आणि कॅनडामध्ये तणाव शिगेला पोहोचला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो उघडपणे खलिस्तान समर्थकांच्या बाजूने आले आहेत.

  खलिस्तानी दहशतवादी हरदिप सिंग निज्जर (Hardeep singh nijjar killed) याच्या हत्येवरुन कॅनडाच्या वक्तव्यावरुन आता बराच तणाव पसरलेला दिसत आहे. कॅनडातील भारतीय गुप्तचर प्रमुखाची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर भारतात काहीस नाराजीचं वातावरण (India canada Conflict) असताना आता खलिस्तानींनी कॅनडात खुलेआम विष पेरण्यास सुरुवात केली आहे. खलिस्तान समर्थक संघटना शिख फॉर जस्टिस (SFJ) ने भारतीय वंशाच्या हिंदूंना त्वरित कॅनडा सोडण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.

  नेमका  प्रकार काय?

  खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येप्रकरणी पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी (Canadian Prime Minister Justin Trudeau) भारताला कोंडीत पकडले आहे. अशा 2019 पासून भारतात बंदी घालण्यात आलेली खलिस्तान समर्थक संघटना सिख फॉर जस्टिस (SFJ) ने भारतीय वंशाच्या हिंदूंना त्वरित कॅनडा सोडून भारतात परतण्याची धमकी दिली आहे. SFJ वकील गुरपतवंत पन्नून यांनी एक व्हिडिओ जारी केला आहे ज्यामध्ये त्यांनी भारतीय वंशाच्या हिंदूंबद्दल म्हटले आहे की तुम्ही केवळ भारताचे समर्थन करत नाही तर तुम्ही खलिस्तान समर्थक शिखांच्या भाषण आणि अभिव्यक्ती दडपण्याचे समर्थन करत आहात. पन्नूनला भारतात दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.

  जस्टिन ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर खलिस्तानी भडकले

  हा व्हिडिओ अशा वेळी समोर आला आहे जेव्हा कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी मंगळवारी जूनमध्ये मारला गेलेला खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याचे वर्णन “कॅनडियन नागरिक” असे केले. एवढेच नाही तर भारत सरकार आणि निज्जर यांच्या मृत्यूमध्ये संभाव्य संबंध असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यानंतर भारताने कॅनडाच्या पंतप्रधानांचे दावे बेताल ठरवून फेटाळले.

  दोन्ही देशाकडून कारवाई

  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या वक्तव्यानंतर कॅनडाच्या सरकारने भारतीय राजनैतिक अधिकारी यांची हकालपट्टी केली. कॅनडाचे सर्व आरोप फेटाळून लावत भारताने कॅनडाच्या मुत्सद्द्याला ५ दिवसांत दिल्ली सोडण्यास सांगितले आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांमधील तणाव शिगेला पोहोचला आहे.