तुर्कियेच्या दूतावासाबाहेर कुराणचे दहन, स्वीडनने अ‍ॅक्टिव्हिस्टला पोलिस संरक्षण दिले, तुर्कियेच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वीडनचा दौरा केला रद्द

रासमस पलूदान असे कुराण जाळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या इस्लामविरोधी विधानांसाठी ओळखले जातात. पलूदान यांनी पोलिस प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन हे कृत्य केले. यासाठी त्यांना पोलिस संरक्षणही पुरवण्यात आले.

    नवी दिल्ली – स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये एका उजव्या विचारसरणीच्या कार्यकर्त्याने शनिवारी तुर्कियेच्या दूतावासाबाहेर पवित्र कुराणचे दहन केले. त्यानंतर तेथील मुस्लिम समुदायाच्या नागरिकांनी तीव्र निदर्शने सुरू केली आहेत. रासमस पलूदान असे कुराण जाळणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. ते आपल्या इस्लामविरोधी विधानांसाठी ओळखले जातात. पलूदान यांनी पोलिस प्रशासनाची रितसर परवानगी घेऊन हे कृत्य केले. यासाठी त्यांना पोलिस संरक्षणही पुरवण्यात आले. यामुळे हा मुद्दा पेटला आहे. त्यातच तुर्कियेच्या संरक्षण मंत्र्यांनी स्वीडनचा दौरा रद्द केल्यामुळे हे प्रकरण अधिकच गंभीर झाले आहे. स्वीडनच्या नाटो सदस्यत्वासाठी हा दौरा अत्यंत महत्त्वाचा होता.

    इस्लामविरोधी भाषणही केले
    अल जजीराच्या वृत्तानुसार, रासमस पलूदान यांनी गतवर्षी एप्रिल महिन्यात कुराण जाळण्यासाठी एक टूर काढण्याची घोषणा केली होती. तेव्हा रमजानचा पवित्र महिना सुरू होता. त्यानंतर त्यांनी शनिवारी म्हणजे 21 जानेवारी रोजी तुर्कियेच्या दुतावासाबाहेर लायटरने कुराणची एक प्रत जाळली. यावेळी त्यांनी इस्लामविरोधी भाषणही केले. कुराणचे दहन करताना तिथे जवळपास 100 जण उपस्थित होते. त्यावेळी पलूदान म्हणाले – तुम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गरज वाटत नसेल, तर तुम्ही स्वीडन नव्हे इतर कुठेतरी जाऊन राहिले पाहिजे.

    मुस्लिम देशांकडून घटनेचा निषेध
    कुराणचे दहन केल्यानंतर तुर्कियेचे परराष्ट्र मंत्री मेलवूत म्हणाले की, स्वीडनला रासमसला कुराण जाळण्यापासून रोखण्यात अपयश आले. हे एक वर्णद्वेषी कृत्य आहे. त्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याशी कोणताही संबंध नाही. दुसरीकडे, स्वीडनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी या घटनेचा निषेध केला. ते म्हणाले की, स्वीडनमध्ये अभिव्यक्तीचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण याचा अर्थ आम्ही अशा प्रकारच्या घटनांचे समर्थन करतो असा होत नाही. कुराण जाळल्याच्या घटनेचा तुर्कियेसह अनेक मुस्लिम देशांनी निषेध केला आहे. सौदी अरेबियाच्या परराष्ट्र मंत्र्याने एक निवेदन जारी करून असहिष्णुता व द्वेषभावना संपवण्याचे आवाहन केले आहे.