Turkey-Earthqueke

तुर्कीत लागोपाठ झालेल्या दोन भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून एनडीआरएफच्या दोन टीम तुर्कीमध्ये जाणार आहेत.

    तुर्की (Turkey Earthquake) आणि सिरियाला (Earthquake In Syria) गेल्या दहा वर्षातल्या सर्वात मोठ्या भूकंपाच्या धक्क्याला सामोरं जावं लागलं आहे. या भूकंपामध्ये मोठी जीवितहानी झाल्याची माहिती आहे. भूकंप झालेल्या ठिकाणी मदतकार्य सुरू आहे. या भूंकपातील मृतांचा आणखी वाढण्याची शक्यता आहे. स्थानिक वेळेनुसार तुर्कीमध्ये पहाटे 4 वाजून 17 मिनिटांनी भूकंपाचा पहिला धक्का जाणवला. त्यानंतर दुपारी 1.24 मिनिटांनी दुसरा धक्का बसला. या भूकंपामध्ये तुर्की आणि सिरीयातील शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. लागोपाठ झालेल्या दोन भूकंपाच्या धक्क्यामुळे 1300 हून अधिक लोकांचा मृत्यू (Death In Earthquake) झाला असून सुमारे सहा हजार लोक जखमी झाले आहेत.

    झोपेतच मृत्यू
    तुर्कीमध्ये लागोपाठ झालेल्या या भूकंपात आतापर्यंत 1300 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. पहाटे झालेल्या या भूकंपामुळे झोपेतच या लोकांना मृत्यून गाठलं. तुर्कीत पहाटे झालेल्या 7.8 रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे प्रमुख शहरांतील अनेक भाग जमीनदोस्त झाले आहेत. तर सिरियाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा भूकंप असल्याचं तिथल्या सरकारचं म्हणणं आहे. सिरियामध्ये आतापर्यंत 326 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर तुर्कीमध्ये आतापर्यंत 900 हून जास्त नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत. तुर्कीतल्या या भूकंपाचं केंद्र गाझियानटेप होतं.

    भूकंपाचे धक्के इतके जोरदार होते की दोन्ही देशातील अनेक इमारती कोसळल्या. अनेक जणांची कुटुंब रस्त्यावर आली आणि काहींची घरं जमीनदोस्त झाली. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

    मोदींनी व्यक्त केलं दु:ख, भारतातून मदत
    तुर्कीमध्ये झालेल्या भूकंपानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोदी म्हणाल की, तुर्कीतील जीवितहानी आणि वित्तहानी यामुळे मला खूप दु:ख झालं आहे. भारत तुर्कीच्या लोकांच्या सोबत उभा आहे. या संकटातून वर येण्यासाठी योग्य ती सगळी मदत करायला आम्ही तयार आहोत.

    तुर्कीत लागोपाठ झालेल्या या दोन भूकंपामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. भारताने तुर्कीसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. भारताकडून एनडीआरएफच्या दोन टीम तुर्कीमध्ये जाणार आहेत. त्यामध्ये एकूण 100 जवानांचा समावेश आहे. त्याशिवाय भारतातून औषधं, गोळ्या, डॉक्टर आणि इतर वैद्यकीय मदत तुर्कीला पाठवण्यात येणार आहे.