म्यानमारच्या लष्कराचा बौद्ध मठावर हल्ला! 28 जणांना रांगेत उभं करुन झाडल्या गोळ्या

थायलंडच्या सीमेला लागून असलेल्या शान प्रांताला सत्तापालटानंतर लष्कराच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच येथे हिंसक हाणामारी होण्याचे प्रकार सर्रास झाले आहेत.

म्यानमारमधुन एक मोठी बातमी समोर येत आहे. म्यानमारच्या लष्कराने एका बौद्ध विहारावर हल्ला करून 28 जणांना ठार केल्याची घटना घडली आहे.  म्यानमारमधील शान राज्यातील एका गावात हा हल्ला करण्यात आला. कारेन्नी नॅशनलिस्ट डिफेन्स फोर्स (KNDF) या बंडखोर संघटनेने हा दावा केला आहे. म्यानमारमध्ये लष्करी सत्तापालट होऊन जवळपास दोन वर्षे झाली आहेत आणि तेव्हापासून भारताच्या या शेजारील देशात लष्कर आणि बंडखोर संघटनांमध्ये हिंसाचार सुरू आहे. अलीकडच्या काही दिवसांपासून लष्कर आणि बंडखोर गटांमध्ये संघर्ष वाढला आहे. अशा परिस्थितीत शनिवारी म्यानमारच्या सैन्याने शान प्रांतातील एका गावावर हल्ला केल्याचे केएनडीएफने वृत्त दिले आहे.

म्यानमारचे हवाई दल आणि लष्कर या दोघांचाही या हल्ल्यात सहभाह होता. सैन्याचा हल्ला टाळण्यासाठी लोक गावातील बौद्ध विहारात लपून बसले, पण तेथेही लष्कराने लोकांना सोडले नाही. 

लोकांना एका रांगेत उभं करुन मारलं

म्यानमार मीडियामध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, म्यानमारच्या लष्कराने केलेला हा हल्ला इतका निर्दयी होता की गावातील अनेक घरेही जाळण्यात आली. लष्कराने लोकांना मठाच्या भिंतीसमोर उभे केले आणि त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. मरण पावलेल्यांमध्ये मठातील भिक्षूंचाही समावेश आहे.

सत्तापालट लष्कर आणि सरकारमध्ये संघर्ष

शान प्रांत हे थायलंडच्या सीमेला लागून असलेले राज्य आहे आणि येथे सत्तापालट झाल्यापासून लष्कराला जोरदार विरोध होत आहे. त्यामुळेच येथे हिंसक हाणामारी होण्याचे प्रकार घडत असतात. करेन्नी संघटना लष्करविरोधी असून शान प्रांताची राजधानी नान नेन हा त्यांचा गड आहे. मात्र, गेल्या काही काळापासून म्यानमारचे लष्कर या भागात आपली पकड मजबूत करत आहे. म्यानमारमध्ये 2021 मध्ये लष्कराने सरकार उलथवून सत्ता काबीज केली होती. तेव्हापासून देशात हिंसाचार सुरूच आहे. या हिंसाचारामुळे म्यानमारमध्ये आतापर्यंत 40 हजार लोक बेघर झाले आहेत. 80 लाख मुले शाळे जाण्यापासुन वंचित आहेत तर 15 दशलक्ष लोक कुपोषित आहेत. आतापर्यंत अधिकृत आकडेवारीनुसार या संघर्षात 2900 लोकांनी जीव गमावला आहे.