नोबेल विजेती मलाला युसूफजई विवाहबंधनात, लहानपणीच्या मित्रासोबत बर्मिंघममध्ये केला निकाह, सोशल मीडियावर शेअर केले फोटो

मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठवणारी मलाला पाकिस्तानच्या स्वात घाटीतील रहिवासी आहे. ९ ऑक्टोबर २०१२ रोजी स्कूल बसने जात असताना तालिबानकडून मलालाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. त्यावेळी तिचे वय १५ वर्षांचे होते. गंभीर परिस्थितीत तिच्यावर इलाज करण्यासाठी तिला इंग्लंडमध्ये आणण्यात आले. तिथे सर्जरीनंतर तिचा जीव वाचला. इंग्लंडमध्ये असलेल्या पाकिस्तानी दुतावासात तिच्या वडिलांना नोकरीही देण्यात आली, त्यानंतर मलालाचे कुटुंब इंग्लंडमध्येच आहे.

    लंडन- पाकिस्तानी चळवळीतील कार्यकर्ती आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेती मलाला युसूफजई (Nobel laureate Malala Yousafzai married)हिने वयाच्या २४ व्या वर्षी इंग्लंडमध्ये निकाह केला आहे. असर नावाच्या तिच्या बालपणीच्या मित्रासोबत तिने विवाह बंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. मलालाने या निकाहचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यात तिचे माता-पिताही दिसत आहेत.

    मलालाने लिहिले आहे, आज माझ्या आयुष्यातील अनमोल दिवस आहे. असर आणि मी आयुष्यभर एकमेकांना साथ देण्यासाठी विवाह बंधनात एकत्र आलो आहोत. बर्मिंघमच्या आमच्या घरात परिवारासह एक छोटासा निहाक समारोह करण्यात आला. पुढील प्रवास एकत्र करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. आम्हाला तुमच्या सदिच्छांची गरज आहे.

    २०१२ साली तालिबानने केलेला जीवघेणा हल्ला

    मुलींच्या शिक्षणाच्या हक्कासाठी आवाज उठवणारी मलाला पाकिस्तानच्या स्वात घाटीतील रहिवासी आहे. ९ ऑक्टोबर २०१२ रोजी स्कूल बसने जात असताना तालिबानकडून मलालाच्या डोक्यात गोळी मारण्यात आली होती. त्यावेळी तिचे वय १५ वर्षांचे होते. गंभीर परिस्थितीत तिच्यावर इलाज करण्यासाठी तिला इंग्लंडमध्ये आणण्यात आले. तिथे सर्जरीनंतर तिचा जीव वाचला. इंग्लंडमध्ये असलेल्या पाकिस्तानी दुतावासात तिच्या वडिलांना नोकरीही देण्यात आली, त्यानंतर मलालाचे कुटुंब इंग्लंडमध्येच आहे.

    आय एम मलाला नावाने आत्मचरित्र

    मुलींच्या शिक्षणाचा लढा लढणाऱ्या मलालाचे, आय एम मलाला नावाने आत्मचरित्रही लिहिले आहे. या आत्मचरित्रासाठी मलालाला ३० लाख डॉलर्स मिळाले होते. हे पुस्तक ८ ऑक्टोबर २०१३ रोजी प्रकाशित झाले होते.

    ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीतून पदवीधर

    २०१४ साली सर्जरी झाल्यानंतर, मलाला कुटुंबासह बर्मिंघममध्ये शिफ्ट झाली. इथे मुलांच्या मदतीसाठी तिने मलाला फंड म्हणून संस्था सुरु केली. मलालाने २०२० साली दर्शनशास्त्र, राजकारण आणि अर्थशास्त्र या विषयात पदवी मिळवली आहे.

    सर्वात कमी वयात २०१४ साली मिळवले नोबेल

    मलालाला २०१४ साली शांतीसाठी नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले. तिच्यासोबत लहान मुलांच्या अधिकारांसाठी काम करणाऱ्या भारतातील . कैलास सत्यार्थी यांनाही हा पुरस्कार देण्यात आला. वयाच्या केवळ १७ व्या वर्षी मलालाला शांती नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.

    लग्नाबाबत केलेल्या वक्तव्याने झाला होता वाद

    एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत, मलालाने लग्न गरेजेचे नाही असे म्हटले होते. लोकं लग्न का करतात, हे मला आत्तापर्यंत कळलेले नाही, असे वक्तव्य तिने केले होते. ही केवळ पार्टनरशीप का असू शकत नाही, साथीदारासाठी तुम्हाला कागदावर सह्या का कराव्या लागतात, असे प्रश्न तिने विचारले होते. मलालाच्या या मुलाखतीनंतर मोठा वाद झाला होता आणि तिच्या वडिलांना यावर स्पष्टीकरण द्यावे लागले होते.