“…अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील ” ; तालिबानचं महिलांसाठी अजब फर्मान

यापूर्वीही तालिबानने स्वतःचे जुलमी कायदे लागू करत संपूर्ण देशात को-एज्युकेशन म्हणजेच एकाच शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिकवण्यास मज्जाव केला आहे. यासोबतच यापुढे पुरूष शिक्षक विद्यार्थिनींना शिकवू शकत नाहीत, असं फर्मान जारी केलं होतं.

    तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता तेथे तालिबानची राजवट सुरू झाली आहे. त्यामुळे येथील नागरिकांच्या मनात भीतीचं वातावरण तयार झालंय. अफगाणिस्तानमध्ये सत्ता स्थापन झाल्यानंतर तालिबानने अनेक क्रूर फर्मान काढण्यास सुरूवात केली. त्यातच आता त्यांनी महिलांसाठी काढलेल्या फर्मानामुळे नागरिकांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    अजब फर्मान

    अफगाणिस्तानमध्ये ज्या महिलांना लांब पल्ल्याचा प्रवास करायचा असेल त्यांच्यासोबत पुरुष नातेवाईक असणं आवश्यक आहे. जर सोबत पुरुष नातेवाईक नसेल तर या महिलांना प्रवास करता येणार नाही, असं तालिबानी अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. तसेच प्रवासात कारमध्ये म्युझिक वाजवण्यावरही बंदी घातली आहे. प्रवासादरम्यान महिलांना हिजाब घालावा लागेल, असंही फर्मानात म्हटलं आहे. याबाबतची माहिती तालिबानी मंत्रालयाचे प्रवक्ते सादिक अकीफ मुहाजिर यांनी दिली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

    दरम्यान, यापूर्वीही तालिबानने स्वतःचे जुलमी कायदे लागू करत संपूर्ण देशात को-एज्युकेशन म्हणजेच एकाच शाळेत विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना शिकवण्यास मज्जाव केला आहे. यासोबतच यापुढे पुरूष शिक्षक विद्यार्थिनींना शिकवू शकत नाहीत, असं फर्मान जारी केलं होतं. अफगाणिस्तानचे उच्च शिक्षण मंत्री शेख अब्दुल बाकी हक्कानी यांनी याबाबतची घोषणा केली होती.