पाकिस्तानचे लष्करच म्हणतंय, ‘इम्रान खान यांची अटक योग्य, कोणीही कायदा हातात घेऊ नये’

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्यावतीनं इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर (Islamabad Highcourt) ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानातील वातावरण तापलं असून, हिंसाचार सुरू आहे.

    इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांना अटक करण्यात आली आहे. पाकिस्तानी रेंजर्सच्यावतीनं इस्लामाबाद हायकोर्टाबाहेर (Islamabad Highcourt) ही कारवाई करण्यात आली. त्यानंतर पाकिस्तानातील वातावरण तापलं असून, हिंसाचार सुरू आहे. ‘पीटीआय’ नेत्यांनी कार्यकर्ते आणि समर्थक निषेध म्हणून रस्त्यावर उतरले आहेत. त्यांच्याकडून जाळपोळ केली जात आहे. पण पाकिस्तानच्या लष्कराने इम्रान खान यांची अटक योग्य असल्याचे म्हटले आहे.

    आयएसपीआरने (Inter Services Public Relations) बुधवारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) चे प्रमुख इम्रान खान यांच्या अटकेचा संदर्भ दिला आहे. तसेच निदर्शने विशेषतः लष्कराच्या मालमत्ता आणि आस्थापनांना लक्ष्य करण्यात आल्याचेही सांगितले.

    लष्कराच्या मीडिया विंगने सांगितले की, ‘इम्रान खान यांची अटक योग्य, कोणीही कायदा हातात घेऊ नये. आयएसपीआरने इम्रान खानच्या अटकेचे समर्थन केले आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर लष्करविरोधी घोषणा देण्यासह मालमत्ता आणि प्रतिष्ठानांना लक्ष्य करण्यात आले. पण जे कोणी कायदा हातात घेतात त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असेही म्हटले आहे.

    अल् कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक

    इम्रान खान यांना अल् कादिर ट्रस्टच्या प्रकरणात अटक करण्यात आलेली आहे. हा विद्यापीठाशी संबंधित मोठं प्रकरण असल्याचं सांगण्यात येतंय. इम्रान खान यांनी पंतप्रधान पदावर असताना या विद्यापीठाला कोट्यवधींची जमीन बेकायदेशीर मार्गानं दिल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा गौप्यस्फोट पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मलिक रियाज यांनी केला होता.