पाकिस्तान स्फोटातील मृतांची संख्या पोहोचली 52 वर; 60 जण जखमी, मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश!

बलुचिस्तानचे काळजीवाहू मुख्यमंत्री अली मर्दान खान डोमकी यांनी या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे.

    जगभरात शुक्रवारी ईद-ए-मिलाद-उन-नबी सण साजरा करण्यात येत असताना  पाकिस्तानातील (Pakistan Blast) बलुचिस्तान येथे मशिदीबाहेर स्फोट झाला. या स्फोटातील मृतांची संख्या 52 वर पोहोचली आहे तर, 60 जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचाही समावेश आहे.

    शुक्रवारी ईचचा सण असल्याने सकाळी अनेक नागरिक मशिदीत नमाज अदा करण्यासाठी आले होते. सहाय्यक आयुक्त अताउल्ला मुनीम यांनी सांगितले की, बॉम्बस्फोटाचा प्रभाव जास्त होता कारण घटनास्थळी मोठी गर्दी होती. हा स्फोट, सप्टेंबरमध्ये झालेला जिल्ह्यातील दुसरा मोठा स्फोट आहे. यावेळी मशिदीजवळील परिसरातील 43 जण जागीच ठार झाले. तर, मस्तुंग जिल्हा प्रशासनाने सांगितले की, 51 जखमींना क्वेटा येथे हलवण्यात आले आहे. मृतांमध्ये मस्तुंगचे पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) नवाज गशकोरी यांचा समावेश आहे.

    बलुचिस्तानच्या पोलिस प्रमुखांनी सांगितले की, पोलिसांनी आत्मघातकी हल्लेखोराला संशयावरून थांबवण्याचा प्रयत्न केला जेव्हा नंतर त्याने स्वत: ला उडवले. जखमींमध्ये तीन पोलीस हवालदारांचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. त

    प्रांतीय काळजीवाहू माहिती मंत्री जान अचकझाई यांनी सांगितले की, स्फोटात गंभीर जखमी झालेल्यांना क्वेटा येथे हलवण्यात आले असून शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये आणीबाणी लागू करण्यात आली आहे.

    3 दिवसांचा दुखवटा

    बलुचिस्तानचे काळजीवाहू मुख्यमंत्री अली मर्दान खान डोमकी यांनी या दुर्घटनेनंतर संपूर्ण प्रांतात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तर, काळजीवाहू पंतप्रधान अन्वर-उल-हक यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला आणि या घटनेत झालेल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. जखमींना वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. बलुचिस्तानचे अंतरिम गृहमंत्री झुबेर जमाली यांनी मस्तुंग बॉम्बस्फोटाचा निषेध केला असून, घटनेचा अहवाल मागवला आहे. राष्ट्रपती डॉ आरिफ अल्वी यांनीही बलुचिस्तान जिल्ह्यातील प्राणघातक स्फोटाचा निषेध केला आहे. दहशतवादी हल्ल्याचा निषेध करताना काळजीवाहू माहिती मंत्री मुर्तझा सोलंगी म्हणाले की, दहशतवादाच्या भ्याड कृत्याने देशाचे मनोबल खचू शकत नाही. “संपूर्ण पाकिस्तान दहशतवादाच्या विरोधात एकवटला आहे. दहशतवादी घटक कोणत्याही सवलतीस पात्र नाहीत,” असे मंत्री म्हणाले.सुरक्षा दल आणि जनतेच्या सहकार्याने सरकार दहशतवादाचा पूर्णपणे नायनाट करेल, असेही ते म्हणाले.