चीनमध्ये लॉकडाऊनच्या विरोधातील आंदोलन चिघळलं, रिपोर्टींग करणाऱ्या पत्रकाराला मारहाण!

चीनमध्ये कोविड-19 चा कहर पाहायला मिळत आहे. या दरमयाना आंदोलनाचं रिपोर्टींग करायला गेलेल्या पत्रकारावर हल्ला करण्यात आल्याची माहिती आहे. बीजिंग-शांघाय आणि वुहानसह पाच शहरांमध्ये लोक रस्त्यावर उतरले आहेत.

  चीन : चीनमध्ये सध्या तणावाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने झिरो कोविड धोरणांतर्गत कडक लॉकडाऊन करण्यात आलयं. या विरोधात चीनमध्ये गेल्या काही दिवसापासून सरकारविरोधी निदर्शने (China Protests)करण्यात येत असून ही निदर्शनं आता अधिक तीव्र होत आहेत. या आंदोलनाची झळ माध्यमकर्मींनाही बसली असून शांघायमध्ये एका आंदोलनाचे रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला मारहाण झाल्याची बातमी आहे. मीडिया हाऊसने वृत्त दिले की कॅमेरामन एडवर्ड लॉरेन्सला सरकारविरोधी निदर्शने कव्हर करताना ताब्यात घेण्यात आले आणि चिनी पोलिसांनी अनेक तास मारहाण केली.

  मीडिया हाऊसचे प्रवक्ते म्हणाले की, शांघायमध्ये आंदोलनाचे वातार्कंन करत असताना  आमचे पत्रकार एडवर्ड लॉरेन्स यांना ताब्यात घेण्यात आले आणि मारहाण करण्यात आली. या घटनेनतंर आंदोलन पुन्हा अधिक चिघळण्याची शक्यता नााकरता येत नाही.

  चीन सरकारने अद्याप माफी मागितली नाही

  या प्रकरणी चीनकडून अद्याप कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही किंवा माफी मागितलेली नाही, असे मीडिया हाऊसच्या वतीने सांगण्यात आले आहे. या घटनेचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती पत्रकार लॉरेन्स असल्याचे सांगितले जात आहे, ज्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

  चीनमध्ये कोरोना रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ

  गेल्या एका आठवड्यापासून चीनमध्ये कोरोनाचा संसर्ग वेगाने पसरत आहे. शनिवारी येथे 24 तासांत 40 हजार रुग्णांची नोंद करण्यात  आली. यापूर्वी येथे एक दिवसात ३५ हजार कोरोना रुग्ण आढळले होते. या नंतर सरकारने झिरो कोवीड पॅालिसी लागू करण्याचा निर्णय घेतला.

  लंडनमधील चिनी दूतावासाबाहेर निदर्शने

  चीनमध्ये कडक लॉकडाऊनच्या विरोधात सुरू असलेली निदर्शने लंडनपर्यंत पोहोचली आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लंडनमधील चिनी दूतावासाबाहेर लोक जमले आणि त्यांनी सरकारविरोधात घोषणाबाजी केली. यावेळी लोकांनी मेणबत्त्या पेटवून उरुमकी येथील दुर्घटनेत प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहिली

  राष्ट्राध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी

  एकीकडे चीनमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत अजूनही वाढ होत आहे. तर दुसरीकडे लोक सरकारच्या झीरो कोविड धोरणाला विरोध करत आहे. सरकारविरोधात घोषणाबाजी करत राष्ट्राध्यक्ष शी जिन पिंग यांच्या राजीनाम्याची मागणी संतप्त नागरिकांकडून केली जात आहे.