१० मुलांना जन्म देणाऱ्या महिलेस १३ लाखांचे बक्षिस; ‘मदर हिरोईन’ योजना

राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी योजनेला 'मदर हिरोईन' असे नाव दिले आहे. पुतिन यांनी रशियाची कमी होत चाललेली लोकसंख्या वाढावी म्हणून ही योजना आणली आहे. रशियन राजकारण आणि सुरक्षा तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी टाइम्स रेडिओवर बोलताना ही माहिती दिली.

    मॉस्को : कोरोना (Corona) आणि रशिया-युक्रेन युद्धाचा (Russia-Ukraine War) मोठा परिणाम रशियाच्या लोकसंख्येवर झाला आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin) यांनी देशाची लोकसंख्या (Population Scheme) वाढवण्यासाठी अजब योजना आणली आहे. रशियन महिलांना १० मुले जन्माला घालण्यासाठी आणि ते जगावे म्हणून १३ हजार ५०० पौंड देण्याची घोषणा केली आहे.

    राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी योजनेला ‘मदर हिरोईन’ (Mother Heroine) असे नाव दिले आहे. पुतिन यांनी रशियाची कमी होत चाललेली लोकसंख्या वाढावी म्हणून ही योजना आणली आहे. रशियन राजकारण आणि सुरक्षा तज्ज्ञ डॉ. जेनी मॅथर्स यांनी टाइम्स रेडिओवर बोलताना ही माहिती दिली. याच दरम्यान रशिया-युक्रेन युद्धात ५० हजारपेक्षा अधिक रशियन सैनिकांना जीव गमवावा लागला आहे. तसेच, देशात कोरोनामुळे हजारो मृत्यूही झाले आहेत. अशातच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची ‘मदर हिरोईन’ योजना ही याशीच जोडून पाहिली जात आहे.

    डॉ. जेनी मॅथर्स म्हणाल्या आहेत की, पुतिन यांचे म्हणणे आहे की मोठे कुटुंब असलेले लोक अधिक देशभक्त असतात. म्हणजेच देशभक्तीबद्दल बोलताना ते महिलांना अधिक मुले जन्माला घालण्याचा संदेश देत आहेत. तसेच, युक्रेनसोबत युद्धाचे संकट वाढत असताना रशियाची लोकसंख्या वाढावी म्हणून हे प्रयत्न सुरू आहेत. अशातच पुतीन यांच्या या योजनेनुसार, रशियन महिलांना १० लाख रूबल म्हणजेच १३.५ हजार पौंड दिले जाईल. महिलेच्या दहाव्या अपत्याच्या पहिल्या वाढदिवशी तिला हे पैसे दिले जातील. पण रशियन सरकारची अट अशी आहे की, पहिली नऊ मुलदेखील जगले पाहिजेत.