अमेरिकेत गोळीबार, 10 ठार, 19 जखमी; कॅलिफोर्नियात चिनी नववर्षाच्या आनंद सोहळ्यात घडली घटना

स्थानिक माध्यमांनी या घटनेत जवळपास 10 जण ठार, तर 19 जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही. काही सोशल मीडिया अकाउंट्सवर ही घटना वर्णद्वेषातून घडल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व आशियाई कम्युनिटीच्या कार्यक्रमात हा हिंसाचार झाला.

    नवी दिल्ली- अमेरिकेच्या कॅलिफोर्नियात रविवारी सार्वजनिक ठिकाणी गोळीबाराची घटना घडली आहे. त्यात अनेकजण ठार झाल्याची भीती आहे. यासंबंधीच्या वृत्तानुसार, चिनी नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी नागरिक मोंटेरी पार्क भागात जमले होते. तिथे ही घटना घडली.

    वर्णद्वेषातून घडली घडल्याचा दावा
    स्थानिक माध्यमांनी या घटनेत जवळपास 10 जण ठार, तर 19 जण जखमी झाल्याचा दावा करण्यात आला आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याची पुष्टी केली नाही. काही सोशल मीडिया अकाउंट्सवर ही घटना वर्णद्वेषातून घडल्याचा दावा करण्यात आला आहे. स्थानिक नागरिक व आशियाई कम्युनिटीच्या कार्यक्रमात हा हिंसाचार झाला. यासंबंधीच्या वृत्तानुसार, मृतांत एक महिला व तिच्या 6 महिन्याच्या मुलाचाही समावेश आहे. याशिवाय 17 वर्षांचा एक चिनी वंशाचा तरुणही यात मारला गेला आहे. पोलिस लवकरच या घटनेविषयी अधिकृत निवेदन जारी करणार आहेत.

    मृतांचा आकडा वाढण्याची भीती
    ‘स्काय न्यूज’ने स्थानिक प्रशासनाचा दाखला देत म्हटले आहे की, गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी मोठ्या आवाजात डीजे सुरू होता. त्यामुळे काहीवेळापर्यंत हा गोळीबार झाल्याचे कुणाच्याही लक्षात आले नाही. अनेकांना ही आतषबाजी असल्याचे वाटले. पण नंतर जखमी जीवाच्या आकांताने पळत असल्याचे पाहून वस्तुस्थिती लक्षात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, गोळीबार झाला तेव्हा घटनास्थळी हजारोंची गर्दी होती. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. येथे गत 2 दिवसांपासून हा फेस्टिव्हल सुरू होता. विशेष म्हणजे या भागात यापूर्वीही स्थानिक श्वेतवर्णीय व आशियाई समुदायातील नागरिकांत हिंसाचाराच्या घटना घडल्यात. गतवर्षी अशाच एका घटनेत 5 जणांचा बळी गेला होता.