… तर आता प्रिन्स हॅरी मानसिक आरोग्यावर काम करणाऱ्या स्टार्टअप सोबत काम करणार; जाणून घ्या काय आहे पद आणि पगार

प्रिन्स हॅरी आता सॅन फ्रान्सिस्को येथील स्टार्टअप बेटर अपसोबत चीफ इम्पॅक्ट ऑफिसर नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करते.

    ब्रिटीश राजघराण्यापासून स्वंतत्र झाल्यानंतर प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन मार्केल कॅलिफोर्नियात वास्तव्यास आहेत. प्रिन्स हॅरीने राजघराणं सोडल्यानंतर आता सॅन फ्रान्सिस्को येथील स्टार्टअप बेटर अपसोबत चीफ इम्पॅक्ट ऑफिसर नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे. ही कंपनी कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी काम करते. याठिकाणी काम करण्यासाठी हॅरी यांना देण्यात येणाऱ्या वेतनासंबंधी कोणत्याही प्रकारची माहिती अद्याप सार्वजनिक करण्यात आलेली नाही.

    कंपनीचे सीईओ एलेक्सी रॉबिचॉक्स यांच्या मतानुसार प्रिन्स हॅरी हे आमच्या कंपनीत कामासाठी अगदी योग्य व्यक्ती आहेत. त्यांची प्रोत्साहित करण्याची आणि कामाच्या माध्यमातून प्रभाव पाडण्याची पद्धत चांगली आहे. बेटरअप कंपनी अनेक मोठ्या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसोबत मानसिक आरोग्य आणि कोचिंगच्या क्षेत्रात काम करते. याशिवाय प्रिन्स हॅरी आणि पत्नी मेगन यांनी नेटफ्लिक्ससोबत कंटेट तयार करणे आणि स्पॉटिफायसोबत पॉडकास्ट तयार करण्यासंबंधीकरार केला आहे. बेटरअप कंपनीसोबत काम करण्यासंबंधी माहिती हॅरीने ब्लॉगमध्ये दिली आहे.

    बेटरअपची सुरूवात २०१३ मध्ये झाली होती. आता कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची संख्या वाढून २७० झाली आहे. सोबतच २ हजार कोचचं नेटवर्कही कंपनीने तयार केलंय. कंपनीच्या क्लाइंट्समध्ये नासा, शेवरॉन, मार्क, स्नॅप आणि वॉर्नर मीडियासारख्या कंपन्यांचा समावेश आहे.

    द सनने दिलेल्या वृत्तानुसार, प्रिन्स हॅरी आपल्या कॅलिफोर्नियातील घरातूनच काम करणार आहे. तो इथे पत्नी आणि मुलासोबत १४५०० स्क्वेअर फुटाच्या अलीशान घरात राहतो. मीडिया रिपोर्टनुसार, या घरात ९ खोल्या आहेत. तर १६ बाथरूम आहेत. इथे स्वीमिंग पूल, प्ले ग्राउंड आणि टेनिस कोर्टही आहे.