लवकरच नियमित सैन्यदलाची बांधणी करणार, तालिबानने केली घोषणा ;  माजी सैनिकांनाही मिळणार सैन्यदलात स्थान

माजी सैनिकांनी समोर येवून या सैन्यदलात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले. तर एका माजी अफगाण सैन्याधिकाऱ्याने सांगितले की तालिबानने माजी ३ लाख सैनिकांचा विचार करायला हवा. आत्ता या सैनिकांच्याकडे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नाही.

    काबूल : अफगाणिस्थान ताब्यात घेऊन एक महिना उलटल्यानंतर आता नव्या सैन्यदलाची बांधणी करणार असल्याची घोषणा तालिबानने केली आहे. काळजीवाहू सरकारचे चिफ ऑफ स्टाफ कारी फसीउद्दीन यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच सैन्यदलाची बांधणी करणार असून, त्यात माजी सैनिकांचाही समावेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अफगाणिस्थानवर बाहेरुन आणि आतून येणाऱ्या संकटांचा मुकाबला हे सैन्यदल करणार आहे.

    कारी यांनी टोलो न्यूजला दिलेल्या मुलाखतीत लवकरच सैन्य गठित करण्याची आपली योजना सांगितली. आमचे आमच्या देशावर प्रेम असून, इतर देशांप्रमाणे तालिबानचेही सैन्यदल उभारण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. सैन्यदलाद्वारे देशातील नागरिक आणि सीमांचे रक्षण करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

    जे सैनिक सैन्यदलात होते, त्यातील चांगल्या सैनिकांचा समावेश सैन्यदलात करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले. सैन्यदलात प्रशिक्षित तालिबानही असतील, हेही सांगायला ते विसरले नाहीत. माजी सैनिकांनी समोर येवून या सैन्यदलात सहभागी व्हायला हवे, असे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले. तर एका माजी अफगाण सैन्याधिकाऱ्याने सांगितले की तालिबानने माजी ३ लाख सैनिकांचा विचार करायला हवा. आत्ता या सैनिकांच्याकडे कोणतेही उदरनिर्वाहाचे साधन नाही.

    अफगाणिस्थानात तालिबानने काळजीवाहू सरकारची स्थापना केल्यानंतर, गेल्या राजवटीत असलेल्या सैनिक, संरक्षण आणि गुप्तहेर विभागात काम करणाऱ्यांचे काय होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जात होता. तालिबान सरकार यावर विचार करत आहे का, असेही विचारले जात होते. त्यामुळे चिफ ऑफ स्टाफ यांच्या वक्तव्याला महत्त्व निर्माण झाले आहे.