अफगाणिस्तानात तालिबानचा नवा हुकूम : रेस्टॉरंटमध्ये पती-पत्नी एकत्र जेवण करू शकणार नाहीत, महिला व पुरुषांना वेगवेगळ्या दिवशी मिळणार पार्कमध्ये प्रवेश

सदाचाराचा प्रसार आणि वाईट गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी मंत्रालयाने लागू केलेला हा नियम पती-पत्नीलाही लागू होईल. एका अफगाण महिलेने सांगितले की, नुकतीच ती तिच्या पतीसोबत हेरात रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथे मॅनेजरने तिला पतीपासून वेगळे बसून जेवायला सांगितले होते.

    नवी दिल्ली – तालिबानने अफगाणिस्तानच्या पश्चिम हेरात प्रांतात लैंगिक भेदभावासंबधी योजना लागू केली आहे. या अंतर्गत पुरुषांना यापुढे फॅमिली रेस्टॉरंटमध्ये कुटुंबातील सदस्यांसोबत जेवण करण्याची परवानगी मिळणार नाही. याशिवाय स्त्री-पुरुषांनाही एकत्र पार्कमध्ये जाण्याची परवानगी नाही.

    सदाचाराचा प्रसार आणि वाईट गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी मंत्रालयाने लागू केलेला हा नियम पती-पत्नीलाही लागू होईल. एका अफगाण महिलेने सांगितले की, नुकतीच ती तिच्या पतीसोबत हेरात रेस्टॉरंटमध्ये गेली होती. तिथे मॅनेजरने तिला पतीपासून वेगळे बसून जेवायला सांगितले होते.

    मंत्रालयाचे अधिकारी रियाझुल्ला सीरत यांनी सांगितले की, हेरातमधील उद्यानांसाठीही असाच आदेश जारी करण्यात आला आहे. त्यानुसार महिला व पुरुषांना वेगवेगळ्या दिवशी उद्यानात जाण्यास सांगण्यात आले आहे. गुरुवार, शुक्रवार आणि शनिवार हे महिलांचे दिवस आहेत, तर पुरुषांची उद्याने रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार या दिवशी खुली असतील.

    महिलांवर अनेक निर्बंध लादले
    असाच आदेश तालिबानने मार्चमध्येही जारी केला होता. यामध्ये महिला आणि पुरुषांना एकाच दिवशी मनोरंजन उद्यानात जाण्यास बंदी घालण्यात आली होती. याआधीही तालिबान राजवटीने महिलांवर अनेक निर्बंध लादले आहेत. यामध्ये एकट्याने प्रवास करण्यावर बंदी, लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी पुरुषाला सोबत घेण्याची गरज, महिलांना ड्रायव्हिंग लायसन्स देण्यावर बंदी, हिजाब परिधान करणे सक्तीचे, दुकानांबाहेर महिलांचे फोटो असलेले फलक काढणे आदींचा समावेश आहे.