पुरामुळे सर्वात मोठा विनाश, आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू तर ९० लाख लोक बेघर

मान्सून वादळ आणि संततधार पावसाने संपूर्ण बांगलादेशाला वेढले आहे. तेथील परिस्थिती भयावह झाली आहे.

  ढाका : मान्सून वादळ आणि संततधार पावसाने संपूर्ण बांगलादेशाला वेढले आहे. तेथील परिस्थिती भयावह झाली आहे . पुरात आतापर्यंत ३२ जणांचा मृत्यू झाला आहे.घरात पाणी शिरल्याने आणि सामानाची नासधूस झाल्याने सुमारे ९० लाख लोक बेघर झाले आहेत. बांगलादेशचे लष्कर स्थानिक प्रशासनासह बचाव आणि मदत कार्यात गुंतले आहे.
  गेल्या आठवड्यात, बांगलादेश आणि भारताच्या ईशान्येकडील राज्यांना संततधार पावसाचा सामना करावा लागला, ज्यामुळे देशाच्या अनेक भागांमध्ये पूर आला. आपत्ती व्यवस्थापन आणि मदत कार्य राज्यमंत्री इनामुर रहमान म्हणाले की, मेघालय आणि आसाममध्ये मुसळधार पावसामुळे बांगलादेशमध्ये भीषण पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. ते म्हणाले की, सिल्हेत आणि सुनमगंज जिल्ह्यांमध्ये १२२ वर्षांतील हा सर्वात भीषण पूर आहे.
  वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला
  सिल्हेतची परिस्थिती अत्यंत बिकट आहे, जिथे वीज पडून ९ जणांचा मृत्यू झाला आहे. यासह बांगलादेशात वीज पडून एकूण २१ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. सिल्हेट, सुनमगंज, ब्राह्मणबाडिया आणि बांगलादेशच्या उत्तरेकडील भागात भीषण पुराचा सामना करावा लागला आहे.त्यामुळे सिलहट आणि सुनमगंज जिल्हे देशाच्या इतर भागापासून तुटले आहेत यावरून पुराच्या तीव्रतेचा अंदाज लावता येणे शक्य आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सिलहट रेल्वे स्थानक आणि आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्व कामकाज शुक्रवारपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. दळणवळण सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली असून सिल्हेटमधील स्थानिक प्रशासनाला परिस्थिती हाताळणे कठीण जात आहे.
   मेघालयातील डोंगराळ भागातून खाली जाणार्‍या पाण्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. सिल्हटमधील सुमारे ३ लाख लोकांना आश्रयस्थानांमध्ये आश्रय घ्यावा लागला. गेल्या शनिवारी आलेल्या पुराच्या तीव्रतेमुळे आरोग्य विभागाचे पथक सिल्हेतला जाऊ शकले नाही आणि त्यांना ढाका येथे परतावे लागले. देशातील दहा जिल्ह्यांतील ६४ उपविभागांना पुराचा फटका बसल्याचे सरकारचे म्हणणे आहे.
  बांगलादेशच्या फ्लड फोरकास्टिंग अँड वॉर्निंग सेंटर (FFWC) ने सांगितले की, पुढील २४ तासात सुनामगंज आणि सिल्हेटमधील परिस्थितीत कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. यासोबतच उत्तर आणि उत्तर-पूर्व भागातही मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
  लोक घरांच्या छतावर आसरा घेत आहेत
  गेल्या आठवड्यात सुनमगंजमध्ये लोकांना घरांच्या छतावर आसरा घ्यावा लागला कारण त्यांच्या घरात पाणी शिरले आणि बोटीच्या मदतीने त्यांची सुटका करण्यात आली. येथील जिल्हा रुग्णालये पुरात बुडाल्याने नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहे. त्यातच पाणी साचल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असून, यासोबतच नागरिकांना तीन दिवस खाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे.
  सर्व सेवा बंद
  रुग्णालये, अग्निशमन सेवा, अन्न गोदामांपासून ते आपत्कालीन सेवांपर्यंत बहुतांश संस्था पाण्याखाली गेल्या आहेत. मुसळधार पावसामुळे मोबाईल आणि इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली आहे. बोगुरा, जमालपूर, गायबांधा आणि लालमोनिरहाटमध्ये संततधार पावसामुळे अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली आहे.
  मुलांचे भविष्य टांगणीला 
  पुराच्या विध्वंसामुळे १ कोटी ६० लाखांहून अधिक मुलांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. मुलांना अन्न, शुद्ध पाणी आणि औषधाची गरज आहे. बांगलादेशचे सैन्य युनिसेफच्या सहकार्याने आपत्तीग्रस्त भागात पोहोचले आहे जेणेकरून लोकांना आवश्यक ती मदत करता येईल.