‘या’ कुटुंबातील पुरुषांना फिंगर प्रिंटच नाही; सरकारी अधिकारीही चक्रावले

अमल आणि अप्पू यांच्या आजाराबद्दल माहिती समोर आल्यानंतर बांगलादेश सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका विशेष वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नवीन राष्ट्रीय ओळखपत्र देण्यात आले.

ढाका. बांगलादेशमधील एका कुटुंबातील पुरुषांच्या हाताचे ठसे म्हणजेच फिंगर प्रिंट्सच उपलब्ध नसल्याची चमत्कारिक माहिती समोर आली आहे. अप्पू सरकार आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषासंदर्भातील हा विचित्र प्रकार समोर आल्यानंतर सर्वचजण गोंधळात पडले आहेत. बांगलादेशच्या उत्तरेकडील राजशाही जिल्ह्यात सरकार कुटुंब राहते. अप्पू आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांना जेनेटिक म्यूटेशनचा त्रास असल्याने त्यांच्या हातांचे ठसे उमटत नाहीत असे सांगण्यात आले आहे. अशाप्रकारचे जेनेटिक म्यूटेशन जगभरातील अगदीच मोजक्या व्यक्तींमध्ये दिसून येते. मात्र, आता फिंगर प्रिंटच उपलब्ध नसल्याने अप्पू आणि त्याच्या कुटुंबातील पुरुषांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे.

आपल्या पूर्वजांपासून पुरुषांच्या हातांच्या ठशांची समस्या असल्याचे अप्पू सांगतो. त्यावेळी हातांचे ठसे नसले तरी फारशी कामे अडायची नाही. मात्र, आता आधुनिक काळात फिंगर प्रिंटचे महत्त्व वाढले आहे. बोटांवर चालणाऱ्या या स्मार्ट जगात बायोमेट्रीक डेटा जमा केला जातो. आज याच बायोमेट्रीक गोष्टी आता व्यक्तींची ओळख असते. अगदी विमानतळापासून ते ओळखपत्रांपर्यंत आणि सर्वच डिजिटल कामांमध्ये सध्या फिंगर प्रिंट वापरले जातात. बांगलादेशमध्ये २००८ साली सर्व वयस्कर व्यक्तींसाठी राष्ट्रीय ओळखपत्र देण्याची मोहीम सुरू करण्यात आली. या ओळखपत्रासाठी डेटा बेस म्हणून नागरिकांच्या अंगठ्याचे ठसे घेण्यात आली. मात्र त्यावेळीही अप्पूच्या अंगठ्याचा ठसा घेताच आला नाही. त्याच्या वडिलांबरोबर म्हणजेच अमल सरकार यांच्यासोबतही हीच अडचण येत होती. त्यामुळे केंद्रावरील कर्मचाऱ्यांना अप्पू आणि त्याच्या वडिलांना ओळखपत्र कसे द्यायचे हा प्रश्न पडला. अखेर अप्पू आणि त्याच्या वडिलांना नो फिंगप्रिंटचा स्टॅम्प मारून ओळखपत्र बनून देण्यात आली, असे सांगण्यात येत आहे.

विशेष प्रमाणपत्र
अमल आणि अप्पू यांच्या आजाराबद्दल माहिती समोर आल्यानंतर बांगलादेश सरकारच्या वतीने जारी करण्यात आलेल्या एका विशेष वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे त्यांना नवीन राष्ट्रीय ओळखपत्र देण्यात आले. या कार्डामध्ये रेटिना स्कॅन आणि चेहऱ्याशी संबंधित ओळख आहे. मात्र, त्यांना अगदी सीम कार्ड घेण्यापासून ते पासपोर्ट तयार करण्यापर्यंत अनेक कामांसाठी इतरांपेक्षा जास्त वेळ खर्च करुन त्रासही सहन करावा लागतो.