चीनमधील आयफोनच्या प्रकल्पात हिंसक आंदोलन; निदर्शने करणाऱ्यांना मारहाण

चिनी समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या चित्रफितीनुसार झोंगझोऊ येथील कारखान्यातील हजारो निदर्शक हे पांढरे सुरक्षात्मक कपडे घातलेल्या पोलिसांबरोबर वाद घालताना दिसत आहेत. एका व्यक्तीला काठीने मारहाण करण्यात आली आणि अन्य व्यक्तींचे हात पाठीमागे बांधून त्यांना नेण्यात येत असल्याचेही दिसते.

    बीजिंग – अ‍ॅपल इंकच्या (Apple Ink) चीनमधील मुख्य आयफोन उत्पादन (I-Phone Production) प्रकल्पात बुधवारी कामगार (Workers) आणि सुरक्षा कर्मचारी (Security) यांच्यात वाद झाला. हा प्रकल्प फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी (Foxconn Technology) ग्रुपचा असून फॉक्सकॉन कंपनीनेही याबाबत दुजोरा दिला आहे. कोरोना (Corona) महासाथीला नियंत्रणात आणण्यासाठी महिनाभरापासून निर्बंध घालण्यात येत असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. त्यामुळे या प्रकल्पाच्या आवारात शेकडो कर्मचाऱ्यांनी निर्दशने केली. यावेळी पोलिसांनी आंदोलकांना मारहाण केली आहे.

    चिनी समाजमाध्यमांवर उपलब्ध असलेल्या चित्रफितीनुसार झोंगझोऊ येथील कारखान्यातील हजारो निदर्शक हे पांढरे सुरक्षात्मक कपडे घातलेल्या पोलिसांबरोबर वाद घालताना दिसत आहेत. एका व्यक्तीला काठीने मारहाण करण्यात आली आणि अन्य व्यक्तींचे हात पाठीमागे बांधून त्यांना नेण्यात येत असल्याचेही दिसते. चीनमध्ये कोरोना विषाणू संसर्गामुळे दीर्घकाळापासून दुकाने आणि कार्यालये बंद ठेवण्यात आली. तसेच, लाखो नागरिकांना अनेक आठवडे घरांमध्ये कोंडून राहवे लागले. या प्रतिबंधांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी काही भागात निदर्शने केली आहेत.

    कोरोना विषाणूचा सामना करण्यासाठी पुरेसे उपाय न केल्याने आणि आजारी असलेल्या सहकर्मचाऱ्यांना कोणतीही मदत न मिळाल्याने गेल्या महिन्यात तैवानमधील फॉक्सकॉन टेक्नॉलॉजी ग्रुप कंपनी संचालित कारखान्यातून हजारो कर्मचारी बाहेर पडले होते.