
हो मी लाईव्ह टीव्हीवर पगार मिळत नसल्याचं सांगितलं आहे. कारण अनेक पत्रकार यावर बोलण्यास घाबरतात. याचा अर्थ पत्रकारांनी यावर बोलायला नको असा नाही
लुसाका: कोरोना विषाणू प्रादुर्भाव सुरू झालेल्या जगाची अर्थव्यवस्था खीळखिळी झाली आहे. संसर्गमुळे अनेक कंपन्यांनी कर्मचारी कपात केली तर बऱ्याच कंपन्या बंद पडलेल्या दिसून आले आहे. इतकाच नव्हेतर जे लोक काम करतात त्यांनाही वेळेवर पगार दिला जातं नसल्याचे दिसून आले आहे. बेरोजगारीच्या घटनांच्या वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांचं दुःख मांडणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे. एका वृत्तनिवेदकाने लाईव्ह बुलेटिनमध्येच थांबून आपल्या वेदना सांगितल्यात. ‘ आम्हीही माणसं आहोत, मात्र आम्हाला इथं काम करुनही पगार मिळत नाही’, अशी तक्रार या पत्रकाराने सांगितलीय. या पत्रकाराचं नाव कॅलिमिना काबिंदा (Kalimina Kabinda) असं असून तो झांबियाच्या केबीएन वृत्तवाहिनीत काम करतो. या घटनेनंतर जगभरात या व्हिडीओची चर्चा सुरू आहे
आफ्रिकेतील झांबिया (Zambia) देशातील केबीएन चॅनलमध्ये पत्रकारांकडून काम करुन घेतलं जातंय, मात्र पगार दिला जात नसल्याचा आरोप केबीएनच्या वृत्तनिवेदकाने लाईव्ह टीव्हीवर केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय. कॅलिमिना काबिंदा या पत्रकाराने वृत्तवाहिनीवर बातम्या सांगत असतानाच मध्येच थांबून केबीएन चॅनलमध्ये काम करुनही माझ्यासह अनेक सहकाऱ्यांना पगार मिळत नसल्याचा आरोप त्यानं केला. हा प्रकार १९ जून रोजी घडला.
‘बातम्यांपलिकडे जाऊन आम्हीही माणसं आहोत. आम्हाला आमच्या कामाचा मोबदला मिळाला पाहिजे. दुर्दैवाने आम्हाला केबीएन टीव्हीकडून पगार दिला जात नाहीये. माझ्या सहकाऱ्यांना देखील वेतन दिलं जात नाहीयेव.” इतकंच नाही तर काबिंदाने यानंतर हा व्हिडीओ आपल्या फेसबूक अकाऊंटवरही शेअर केलाय.
‘स्वतःवरील अन्यायावर बोलण्यास पत्रकार घाबरतात’
काबिंदा यांनी व्हिडीओ शेअर करताना लिहिलं, “हो मी लाईव्ह टीव्हीवर पगार मिळत नसल्याचं सांगितलं आहे. कारण अनेक पत्रकार यावर बोलण्यास घाबरतात. याचा अर्थ पत्रकारांनी यावर बोलायला नको असा नाही.” दुसरीकडे केबीएन (KBN TV Journalis) वृत्तवाहिनीचे सीईओ कॅनेडी मांब्वे यांनी चॅनलच्या फेसबुक पेजवर स्पष्टीकरण देत पत्रकार काबिंदा ब्रॉडकास्ट करत असताना नशेत असल्याचा आरोप केलाय. असं असलं तरी त्यांनी पत्रकारांना वेतन दिलंय जातंय की नाही यावर काहीही सांगितलं नाही.