कोरोना विषाणूसंदर्भातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी WHO चे मोठे पाऊल

कोरोनासंदर्भातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मोठे पाऊल उचलले आहे. कोरोना व्हायरसविषयी नवीन अपडेट देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वापरकर्त्यांसाठी 'डब्ल्यूएचओ कोविड-१९ अॅप' नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे

कोरोनासंदर्भातील चुकीच्या माहितीचा प्रसार रोखण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने मोठे पाऊल उचलले आहे. कोरोना व्हायरसविषयी नवीन अपडेट देण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेने वापरकर्त्यांसाठी ‘डब्ल्यूएचओ कोविड-१९ अॅप’ नावाचे मोबाईल अॅप लाँच केले आहे.हे अॅप डब्ल्यूएचओ आणि प्रादेशिक भागीदार दोघांकडून विश्वसनीय अपडेट आणि वैज्ञानिक निष्कर्षांची माहिती प्रदान करेल. डब्ल्यूएचओने या वर्षाच्या सुरूवातीस कोरोना विषाणूसंदर्भात अपडेट देण्यासाठी अशा प्रकारचे अॅप लाँच केले होते. हे अॅप आइओएस ९.० आणि अँड्राएड ४.४ डिव्हाइसमध्ये कार्य करते. २०११ पासून लाँच केलेले बहुतेक स्मार्टफोन या दोन प्रकारांत मोडतात. हे अ‍ॅप एकाच वेळी विविध देशांमधील डब्ल्यूएचओच्या कर्मचार्‍यांच्या टीमने विकसित केले होते.हे अॅप सध्या केवळ नायजेरियामध्ये उपलब्ध आहे. सध्या या अॅपची प्राथमिक चाचणी घेण्यात येत आहे. भविष्यात सर्व इंग्रजी भाषिक देशांना हे अॅप उपलब्ध करून देण्यावर डब्ल्यूएचओ काम करत आहे.

काय आहे नवीन अ‍ॅपमध्ये?
या अ‍ॅपच्या माध्यमातून वापरकर्ते कोरोना विषाणूच्या आजाराची लक्षणे आणि व्हायरसपासून स्वत: चे आणि त्यांच्या समुदायाचे संरक्षण कसे करावे याबद्दल शिकू शकतात. डब्ल्यूएचओकडून नियमित अपडेट प्राप्त करण्यासाठी वापरकर्ते त्यांच्या क्षेत्रातून रीअल-टाइम सूचनांसाठी नोंदणी करू शकतात. हे साथीच्या काळात वापरकर्त्यांना विविध मार्गांनी मदत करण्याबद्दल उपयुक्त ठरणार आहे.