पुतिन नाटोला का घाबरतात, नाटोमध्ये गेल्यास युक्रेनप्रमाणे फिनलंडवर हल्ला करेल का रशिया ?

रशियाने यापूर्वी नाटोमध्ये सामील झाल्यास फिनलंडजवळ अण्वस्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्याची धमकी दिली आहे. फिनलंडच्या अशा घोषणेनंतर रशिया संतापाच्या भरात काही मोठी पावले उचलू शकतो, असे मानले जात आहे.

  नवी दिल्ली – युक्रेन-रशिया युद्धादरम्यान अनेक दशकांपासून तटस्थ राहिलेल्या फिनलंड आणि स्वीडनने नाटोमध्ये सामील होण्याचा आपला इरादा जाहीर केला आहे. फिनिश पंतप्रधान सना मारिन आणि राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो यांनी गुरुवारी सांगितले की ते लवकरच नाटो सदस्यत्वासाठी अर्ज दाखल करतील. मात्र, या घोषणेनंतर रशियाने फिनलंड आणि स्वीडनला परिणाम भोगण्याची धमकी दिली आहे.

  रशियाने यापूर्वी नाटोमध्ये सामील झाल्यास फिनलंडजवळ अण्वस्त्रे आणि हायपरसोनिक क्षेपणास्त्रे तैनात करण्याची धमकी दिली आहे. फिनलंडच्या अशा घोषणेनंतर रशिया संतापाच्या भरात काही मोठी पावले उचलू शकतो, असे मानले जात आहे.

  NATO काय आहे, ज्यामध्ये फिनलंड सामील होऊ इच्छित आहे?

  NATO चे पूर्ण नाव नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन आहे. ही युरोपियन आणि उत्तर अमेरिकन देशांची लष्करी आणि राजकीय युती आहे. ४ एप्रिल १९४९ रोजी अमेरिका, ब्रिटन आणि फ्रान्ससह १२ देशांनी सोव्हिएत युनियनला विरोध करण्यासाठी त्याची स्थापना केली. NATO मध्ये आता 28 युरोपियन आणि दोन उत्तर अमेरिकन देशांसह ३० सदस्य देश आहेत. नाटो देश आणि तेथील लोकसंख्येचे संरक्षण करणे ही या संघटनेची सर्वात मोठी जबाबदारी आहे. NATO च्या कलम 5 नुसार, त्याच्या कोणत्याही सदस्य राष्ट्रावर हल्ला हा सर्व NATO देशांवरील हल्ला मानला जाईल.

  फिन्निश पंतप्रधान सना मारिन आणि राष्ट्राध्यक्ष सौली निनिस्टो यांनी गुरुवारी विलंब न करता नाटोमध्ये सामील होण्यास पाठिंबा जाहीर केला. विशेषत: रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्यानंतर याचे अनेक संकेत आधीच मिळाले होते. फिनलंडमध्ये नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणात देशातील ७६% लोक या निर्णयाच्या बाजूने होते.

  नाटो सदस्यत्वामुळे आपली सुरक्षा मजबूत होईल, असे फिनलंडने म्हटले आहे. तथापि, या वर्षी जानेवारीमध्ये, जेव्हा रशियन सैन्य युक्रेनच्या सीमेजवळ जमत होते, तेव्हा फिन्निश पंतप्रधान म्हणाले की त्यांचा देश नाटोमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे.