maria kerkhove

ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट (Omicron Is Not A Last Variant Of Corona) असणार नाही. याचे भविष्यात आणखी अनेक प्रकार येतील, असं डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria Van Kerkhove) म्हणाल्या आहेत.

    जगभरात कोरोना (Corona) आणि ओमायक्रॉनचे (Omicron) रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. देशातही दैनंदिन रुग्ण ३ लाखांपेक्षा जास्त आढळत आहेत. जागतिक आरोग्य संघटना (World Health Organization) लोकांना लसीकरण (Vaccination) करून मास्कचा वापर सुरू ठेवण्यासाठी सावध करत आहे. यातच आता डब्ल्यूएचओच्या टेक्निकल लीड मारिया व्हॅन केरखोव्ह (Maria van Kerkhove) यांनी महत्वाची माहिती दिली आहे. ओमायक्रॉन हा कोरोनाचा शेवटचा व्हेरियंट (Omicron Is Not A Last Variant Of Corona) असणार नाही. याचे भविष्यात आणखी अनेक प्रकार येतील, असं त्या म्हणाल्या आहेत.

    “हा विषाणू अजूनही विकसित होत आहे आणि बदलत आहे आणि आपल्याला त्यानुसार बदलण्याची आवश्यकता आहे. आपल्याला जगभरातील लसीकरण वाढवायचे आहे, त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. महत्वाचं म्हणजे कोरोना हा आता ज्यामुळे कोरोनाची लाट आहे त्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे संपणार नाही. याचे भविष्यात आणखी व्हेरियंट येतील,” असं मारिया व्हॅन केरखोव्ह यांनी एका मुलाखतीत सांगितले.

    “जगभरात ओमायक्रॉन आणि कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने आरोग्य प्रणालीवर मोठा ताण पडत आहे. त्यातच आपण साथीच्या रोगाच्या तिसऱ्या वर्षात प्रवेश करत आहोत. जर लोकांना आवश्यक असलेली योग्य काळजी मिळत नसेल तर मोठ्या प्रमाणात लोकांना गंभीर आजार होतील आणि मृत्यू देखील मोठ्या प्रमाणात होतील, हेच आम्ही रोखू इच्छितो,” असं त्या म्हणाल्या.

    लसीकरण हा गंभीर रोग, मृत्यू, काही इन्फेक्शन आणि पुढील संक्रमणापासून बचाव करण्यासाठी विश्वसनीय उपाय आहे, मात्र तो परिपूर्ण नाही. त्यामुळे लोकांनी स्वतःचे संरक्षण करण्यासाठी मास्क घालून, सुरक्षित शारीरिक अंतर राखणे, तोंड आणि हात धुणे, गर्दी टाळणे, घरून काम करणे, आवश्यकतेनुसार योग्य काळजी घेणे आणि चाचणी करून घेणे, या गोष्टी करणे आवश्यक आहे,” असं मारिया म्हणाल्या.

    “लसीकरण सुरू झाल्यापासून जगभरात लसींच्या १० अब्ज डोसपैकी, अद्याप तीन अब्ज लोक आहेत ज्यांना पहिला डोस मिळणे बाकी आहे. म्हणून, आपल्याकडे अजूनही अत्यंत संवेदनाक्षम लोकसंख्या आहे. लसीकरणाच्या बाबतीत काही देश पुढे आहेत. त्यामुळे आपल्याला या जागतिक समस्येवर जागतिक उपायांसह उपचार करावे लागतील,” अशी गरज त्यांनी बोलून दाखवली.