मतांच्या जुळवा-जुळवीनंतर निकालाची उत्सुकता शिगेला

मतदान प्रक्रियेनंतर उमेदवारांकडून मतांची गोळाबेरीज झाली. अशात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असुन आज जिल्ह्यातील १६ तहसिलमध्ये सकाळी ८ वाजतापासुन  प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात होणार आहे. दुपारी २ पर्यंत निकाल हाती येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

  • १७ हजार १११ उमेदवारांचा भाग्याचा आज फैसला
  • यवतमाळ येथे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये मतमोजणी

यवतमाळ. जिल्ह्यातील ९२५ ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात मतदारांनी मतदान केले. काही ठिकाणी उशिरापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत ७९.५६ टक्के मतदान झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. मतदान प्रक्रियेनंतर उमेदवारांकडून मतांची गोळाबेरीज झाली. अशात निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली असुन आज जिल्ह्यातील १६ तहसिलमध्ये सकाळी ८ वाजतापासुन  प्रत्यक्ष मतमोजणीला सुरूवात  झाली आहे. दुपारी २ पर्यंत निकाल हाती येणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या व दोन टप्प्यात होणा-या ग्रामपंचायत निवडणूका एकाचवेळी जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आल्या. यामध्ये जिल्ह्यातील ९८० ग्रामपंचायत निवडणूकीची घोषण करण्यात आली. परंतू ५३ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या. तसेच दोन ग्रामपंचायतमध्ये निवडणूका घेण्यात न आल्यामुळे प्रत्यक्ष ९२५ ग्रामपंचायतीमध्ये निवडणूका घेण्यात आल्या. ९२५ ग्रामपंचायतीकरीता जिल्ह्यात ८ हजार १०१ जागांसाठी १७ हजार १११ उमेदवार निवडणूक रिंगणात होते.

याकरीता शुक्रवारी १५ जानेवारीला २ हजार ८३२ मतदान केंद्रावर मतदान घेण्यात आले. मतदान प्रक्रियेदरम्यान काही ठिकाणी अनुचित प्रकार पुढे आले. मात्र, इतर ठिकाणी सर्वत्र उत्साहात मतदारांनी सहभाग घेत मतदान केले. जिल्ह्यात रात्री उशिरापर्यंत ७९.५६ मतदानाची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये मारेगाव तालुक्यात सर्वाधिक ८५ टक्के मतदानाची नोंद करण्यात आली. तर सर्वात कमी पुसद तालुक्यात मतदानाची नोंद करण्यात आली. विशेष म्हणजे पुसद तालुक्यात सर्वाधिक ९८ ग्रामपंचायतीकरीता मतदान प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेच्या दोन दिवसानंतर आज जिल्ह्यातील १६ तहसिलमध्ये मतमोजणी होणार आहे. सकाळी ८.३० वाजतापासून मतमोजणीला सुरूवात होणार असून दुपारी २ पर्यंत निकाल हाती लागणार असल्याचा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त होत आहे.

राजकीय गणीतांची जुळवा-जुळव
१५ जानेवारीला मतदान झाल्यानंतर उमेदवारांकडून राजकीय गणीतांची जुळवा-जुळव करण्यात येत आहे. दोन दिवसाच्या विश्रांतीत अनेक उमेदवारांनी तर स्वता:च एक्झिट पोल तयार करून आपलाच विजय झाल्याच्या अफवा देखील केल्या आहेत. त्यामुळे नागरीक संभ्रमात आले आहे. तर राजकीय नेतेमंडळी कडून देखील मतांची गोळाबेरीज झाली असून आपल्याच पॅनलचा विजय होणार या अवीर्भावात दिसून येत आहे. मात्र उमेदवारांचा जय पराजय हा प्रत्यक्ष निवडणूक निकालानंतरच कळणार आहे.

याठिकाणी होणार मतमोजणी
यवतमाळ तहसिलची मतमोजणी ही शासकीय महिला तंत्रनिकेतन येथे होणार आहे. तसेच बाभुळगाव येथील तहसिल कार्यालयाच्या मुख्य सभागृहात, कळंब येथे प्रशासकीय इमारतीमध्ये, दिग्रस नवीन मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, आर्णी तहसिल कार्यालय, दारव्हा बचत भवनमध्ये, पुसद यशवंत रंग मंदिर, नेर छत्रपती क्रिडा संकुल, राळेगाव तहसिल कार्यालय, घाटंजी नगर परिषद सांस्कृतीक भवन, वणी शासकीय धान्य गोदाम, मारेगाव बाजार समिती सभागृह, झरी तहसिल कार्यालय, महागाव तहसिल कार्यालय, केळापूर जगदंबा देवस्थान, उमरखेड शासकीय धान्य गोदाम याठिकाणी मतदान प्रक्रिया ८.३० वाजतापासून सुरू होणार आहे.