पत्नीच्या अनैतिक संबंधात पतीचा अडथळा; वाटलं आत्महत्या करावी; पण घटनेतून भलतचं आलं समोर

    यवतमाळ (Yavatmal) : बेपत्ता झालेल्या निलेश चौधरी (३२) (Nilesh Chaudhary) रा. रासा यांचा मृतदेह २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास रासा जवळील फुलोरा जंगलात (Fulora forest) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. हत्या की आत्महत्या (Murder or suicide) हा प्रश्न पोलिसांपुढे होता. तपासाअंती आज गुरुवारी हा खून असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. तपासचक्रे फिरवित पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली. त्यात एक विधिसंघर्ष बालकाचा समावेश आहे.

    २७ ऑगस्ट रोजी निलेश सुधाकर चौधरी (३२) रा. रासा हे घरून बेपत्ता झाला होता. याबाबतची तक्रार पोलिसात २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी देण्यात आली. २९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास निलेश यांचा मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत रासा येथील फुलोरा जंगलात आढळून आला. मृतकाची बहिण सीमा मोहन गाडगे हिच्या तक्रारीवरून वणी पोलिसात कलम ३०२,३४ भादंवि नुसार गुन्हा नोंद केला. पोलिसांपुढे आत्महत्या की घातपात, असा प्रश्न निर्माण झाला होता.

    अखेर तपासाअंती चार आरोपी व एका बालकाने ही हत्या केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना आज गुरुवारी अटक करण्यात आली आहे. यामध्ये चंद्रशेखर दुर्गे (३३) रा. रासा यांचे निलेश यांच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. ही बाब निलेश याला माहिती होताच त्याने पत्नीला माहेरी पाठवून दिले. याचा वचपा काढण्यासाठी चंद्रशेखर गोसाई दुर्गे (३२), आशिष बाबाराव पिदूरकर (२५), गौरव कैलास दोरखडे (२२), योगेश विद्याधर उघडे (२०) व एक विधिसंघर्ष बालक यांनी रासा येथे पार्टी केली. त्यानंतर याच ठिकाणी निलेशच्या हत्येचा कट रचण्यात आला.

    त्यांनी निलेश यालाही याच जंगलात बोलाविले. त्याला दारू पाजल्यानंतर त्याचा गळा आवळून खून केला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून या पाचही जणांनी त्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकवून ठेवले व घटनास्थळावरून पसार झाले. सदर आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करणे हे पोलिसांपुढे मोठे आव्हान होते. डीबी प्रमुख आनंदराव पिंगळे यांनी तपास करीत सर्व आरोपींना अटक करण्यात यश मिळविले.

    सदर कारवाई पोलीस अधीक्षक दिलीप पाटील भूजबळ, उपविभागीय पोलीस अधिकारी शाम संजय पूज्जलवार, ठाणेदार शाम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी प्रमुख आनंदराव पिंगळे, एपीआय माया चाटसे, सुदर्शन वनोळे, सुनील खंडागळे, हरेंद्र भारती, पंकज उंबरकर, दीपक वांडूसवार, विशाल गेडाम, शंकर चौधरी, मोहम्मद वसीम आदींनी केली.