शेतकऱ्यांने केलाय ‘असा’ जुगाड हे यंत्र; २० मिनिटांत दोन एकर शेतीची फवारणी

यवतमाळ जिल्ह्याच्या राणी अमरावती येथील दिलेश परडखे या शेतकऱ्याने ट्रॅकर वर फवारणी यंत्र लावून शेतांत फवारणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे यंत्र त्यांनी स्वतः तयार केले आहे. या जुगाड तंत्रज्ञानामुळे फवारणी करताना कुठलीही विषबाधा फवारणी करणाऱ्या व्यक्तीला होत नाही.

    यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्याच्या राणी अमरावती येथील दिलेश परडखे या शेतकऱ्याने ट्रॅकर वर फवारणी यंत्र लावून शेतांत फवारणी सुरू केली आहे. विशेष म्हणजे हे यंत्र त्यांनी स्वतः तयार केले आहे. या जुगाड तंत्रज्ञानामुळे फवारणी करताना कुठलीही विषबाधा फवारणी करणाऱ्या व्यक्तीला होत नाही. शिवाय २० मिनिटांमध्ये २ एकर क्षेत्रात फवारणी होत आहे. त्यामुळे याची जोरदार चर्चा आहे.

    दरम्यान शेतकरी दिलेश परडखे यांनी त्यांच्याकडील ट्रॅक्टरला समोर ३ फूट आणि मागे चाक ४ फूट उंचीची मोठी चाके लावली आहेत. यामुळे सोयाबीनच्या दाट पिकात सुद्धा योग्य पध्दतीने आणि योग्य दाबाने फवारणी करता येणे शक्य झाले आहे. एकसारखी फवारणी झाल्याने पिकांवरील अळी नष्ट करण्यासाठी या फवारणीचा योग्य परिणाम देखील जाणवतो. तसेचं या ट्रॅकर द्वारे पिकांचे डवरण सुध्दा करता येत असल्याने पिकांना योग्य प्रमाणात ऑक्सिजन सुध्दा मिळत आहे. शिवाय असे करतांना पिकांचे नुकसान देखील होत नाही. त्यामुळे पिकांची चांगली वाढी होण्याच्या दृष्टीने याचा लाभ होतो.

    कीटकनाशकांची फवारणी करतांना ट्रॅक्टर वरील व्यक्ती थेट कीटकनाशकाच्या संपर्क येत नसल्याने तिला विषबाधा होत नाही. यासाठी परडखे यांनी घरी असलेल्या २०० लिटर प्लास्टिक ड्रमचा वापर फवारणीचे द्रावण ठेवण्यासाठी केला आहे. त्यांनी ड्रमला स्थानिक बाभूळगाव येथून वेल्डिंग करून घेत त्यास दोन बाजूंनी अडजेस्टेबल लांब पाईप लावला आहे. शिवाय त्याला ११ नोजल दिले आहेत. त्यामुळे त्याद्वारे ऐकावेळी २ ओळीत फवारणी करता येते. तसेच तुरीसारख्या पिकात सुध्दा यामुळे फवारणी ९ फूट उंची पर्यंत करता येते.

    यासाठी २० हजार रुपयांचा खर्च

    जिल्ह्यात अनेक व्यक्ती फवारणी करताना हॅन्डपंपाच्या यंत्राद्वारे फवारणी करतात. त्यामुळे कीटकनाशकांची फवारणी करताना काहींना विषबाधा होते. त्यातून काही जण अत्यवस्थ होवून त्यांचा मृत्यूसुध्दा होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी दिलेश परडखे यांनी स्वतः हे फवारणी यंत्र तयार केले आहे. यासाठी त्यांना २० हजार रुपयांचा खर्च आला असून, आता आजूबाजूच्या भागातील शेतकरी त्यांना फवारणीसाठी बोलावीत आहे.