पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सोयींचा अभाव; ३४ गावांतील रुग्ण घेतात सेवा

पांढरकवडा येथील केळापूर तालुक्यातील पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील 34 गावातील रुग्णांसाठी वरदान ठरत असतानाच येथे पिण्याच्या पाण्याअभावी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे.

  पांढरकवडा (Pandharkavada).  केळापूर तालुक्यातील पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील 34 गावातील रुग्णांसाठी वरदान ठरत असतानाच येथे पिण्याच्या पाण्याअभावी रुग्णांची प्रचंड गैरसोय होत आहे. रुग्णांना निरोगी राहण्यासाठी शुध्द पाण्याचा सल्ला देणारे आरोग्य केंद्रच पाणी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे.

  ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्र येथील रुग्णांसाठी महत्त्वाचे असून मेडिकलला रेफर करण्यापूर्वी त्यांच्यावर प्राथमिक उपचार येथेच होतो. मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र नानाविध समस्यांनी ग्रासलेले आहे. आरोग्य केंद्रात रुग्णांना शुध्द पाणी मिळावे ह्याकरिता आरओ मशीन लावणे गरजेचे आहे. तालुक्यातील पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याचे पाणी म्हणून फलक लावले आहे.

  मात्र येथे पाण्याची टाकी नाही, आरओ मशीन नाही. फक्त पंचायत राज समितीच्या दौऱ्याच्या वेळी पाण्याचे फलक लावून आरोग्य केंद्राची शोभा वाढविण्याचे काम करण्यात आले. तालुक्यातील 34 गावाकरिता आरोग्य सेवा देण्याचे काम पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडे आहे. कानाकोपऱ्यातून उपचारासाठी येथे आल्यानंतर विविध प्रकारच्या अडचणींना रुग्णांसह नागरिकांना तोंड देण्याची वेळ आली आहे. प्रामुख्याने पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पिण्याच्या पाण्याची अडचण प्रचंड जाणवत आहे. अशा परिस्थितीत बाहेरून पाणी आणण्याची वेळ रुग्णांवर येत आहे.

  गैरसोयीकडे लक्ष देण्याची गरज
  आरोग्याच्या दृष्टीने रुग्णांना शुध्द पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टरच देतात. मात्र त्याच आरोग्य केंद्रात शुध्द पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने मोठी चिंतेची बाब आहे. सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून पहापळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दैनंदिन रुग्ण उपचारासाठी येतात तसेच काही रुग्ण प्रसूतीकरिता तर काही रुग्ण शस्त्रक्रियेसाठी चार ते पाच दिवस प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती राहतात. अशात होणाऱ्या गैरसोयीकडे लक्ष देण्याची गरज आहे.

  आरओ मशीनच्या मागणीकरिता पत्र व्यवहार
  पहापळ प्राथमिक आरोग्य केंद्राकडून आम्ही पंचायत समिती तथा ग्रामपंचायत यांच्याकडे आरोग्य केंद्रात आरओ मशीन तथा पाण्याची व्यवस्था करण्यासाठी पाठपुरावा करतोय. मागील तीन वर्षांपासून पत्र व्यवहार सुरू आहे. त्यावर उत्तर अद्याप आलेले नसल्यामुळे आरओ मशीनच्या प्रतीक्षेत आहोत.  — डॉ. एच. पडोळे, वैद्यकीय अधिकारी