महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवर पोलिस तैनात; वाहन व प्रवाशांवर लक्ष ठेवण्यावर भर

महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आरटीओ चेकपोस्ट पिंपळखूटी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाकडून येणाऱ्या वाहन व प्रवाशांवर 'वॉच' ठेवण्यासाठी प्रशासनाने एक चमू तैनात केली आहे.

    पाटणबोरी (Patanbori). महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील आरटीओ चेकपोस्ट पिंपळखूटी येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तेलंगणाकडून येणाऱ्या वाहन व प्रवाशांवर ‘वॉच’ ठेवण्यासाठी प्रशासनाने एक चमू तैनात केली आहे.

    चेकपोस्टवर चार पोलिसांची चमू तथा विकास हिंदी महाविद्यालयाचे प्राध्यापक उपस्थित होते. येणाऱ्या वाहनांची विचारपूस करून पास नसणाऱ्यांना दोनशे रूपये दंडाची पावती देणे सुरू आहे. सदर चमू तैनात झाल्याची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर सदर चमूमध्ये बदल होणार असल्याचे समजते. आज जितक्या गाड्या आल्या त्यांना शासनाच्या इ-पास बद्दल कोणतीही माहिती नव्हती. त्यांना इ-पास काढावे लागते. याबद्दल माहित नव्हते. त्यांना पोलीस प्रशासनातर्फे दंड भरून पुढे जावे लागले.

    24 एप्रिलच्या सायंकाळी व 25 एप्रिलच्या सकाळी 2-2 तेलांगणाकडून ऑक्सिजनच्या गाड्या आल्याची माहिती तेथील कर्मचाऱ्यांनी दिली. लॉकडाउनपूर्वीचा विचार केल्यास सद्यस्थितीत छोट्या गाड्यांचे प्रमाण 25 टक्क्यावर आल्याची माहिती चेकपोस्ट कर्मचाऱ्यांनी दिली. तसेच जडवाहन, ट्रक व तत्सम वाहनामध्ये 50 टक्क्यांने घट झाल्याचे सांगितले जाते. नागरिकांनी विनाकारण बाहेर निघू नये, त्यांना धाक असावा, केवळ महत्त्वाच्या कामाकरीता बाहेर निघावे हा उद्देश असल्याचे सदर चमूने सांगितले. या चमूमध्ये पोलीस प्रशासनाकडून राजकूमार राठोड, मोहन चुटे, निखील उदार तर विकास हिंदी विद्यालयाचे प्राध्यापक सुभाष मांडवगडे, अन्ना मून होते.