उन्हाळी सोयाबीनची लागवड; बोगस व महागड्या बियाण्यांपासून सुटका

 खरीप हंगामात सोयाबीनचे पीक न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. चांगल्या प्रतीचे सोयाबीन नसल्यामुळे बियाणे मिळणे कठीण होणार, हे भविष्यातील संकट लक्षात घेऊन जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी प्रथमच उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग केला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे नजरेस पडते.

  यवतमाळ.   बि-बियाण्यांचे दिवसेंदिवस वाढत असलेले भाव त्यातही बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे़ बोगस व महागड्या बियाण्यापासून सुटका व्हावी म्हणून शेतकऱ्यांनी आता घरचेच बियाणे उपलब्ध करण्याचा पर्याय निवडला असून त्यादृष्टीने उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे़

  खरीप हंगामात सोयाबीनचे पीक न झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला. चांगल्या प्रतीचे सोयाबीन नसल्यामुळे बियाणे मिळणे कठीण होणार, हे भविष्यातील संकट लक्षात घेऊन जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी प्रथमच उन्हाळी सोयाबीन पेरणीचा प्रयोग केला आहे. जिल्ह्याच्या बहुतांश भागात हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे नजरेस पडते.

  खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, तूर व रब्बी हंगामात चणा, गहू या पिकांना जिल्ह्यात महत्त्व दिले जाते. पाण्याच्या कमतरतेमुळे जिल्ह्यात उन्हाळी पिकांचा पेरा फारसा नसतो. ठराविक भागातच भुईमुगाचा पेरा राहतो. यावर्षी समाधानकारक पर्जन्यवृष्टी झाल्यामुळे व विहिरींना काही प्रमाणात पाणी पातळी बरी असल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकांच्या पेरणीकडे मोर्चा वळविल्याचे चित्र दिसते. खरीप हंगामात सोयाबीनचे पीक झाले नाही.

  पीक लागवडीवर केलेला खर्चही निसर्गाच्या अवकृपेमुळे निघाला नाही. झाले ते सोयाबीन पूर्णपणे खराब असल्याने बियाणे उत्पादक कंपन्या चांगल्या सोयाबीच्या शोधात भटकंती करीत आहेत. हीच संधी हेरून जिल्ह्यात शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीन लागवडीचा मार्ग पत्करला. जानेवारी, फेब्रुवारी महिन्यात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी सोयाबीनची पेरणी केली. या पेरणीचे क्षेत्र मोठे नसले तरी समाधानकारक व अपेक्षित उत्पन्नाची हमी असल्याचे सांगण्यात येते.

  सोयाबीनचा बियाण्याकरीता वापर

  सोयाबीन हे पिक ९0 दिवसांचे असते़ जानेवारी महिन्यात पेरणी झाल्यामुळे एप्रिल महिन्याच्या सुरूवातीला  किंवा शेवटी सोयाबीनची काढणी केल्या जाईल़ हंगामाच्या सुरूवातीला पिक येणार असल्याने या सोयाबीनची खरीप हंगामाच्या पेरणीसाठी बियाणे म्हणून शेतकरी राखून ठेवणार आहे़

  कृषी अधिकाऱ्यांनी केली उन्हाळी सोयाबीनची पाहणी

  महागाव: बि-बियाण्याचे दिवसेंदिवस वाढत असलेले भाव त्यातही बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे़ बोगस व महागड्या बियाण्यापासून सुटका म्हणून शेतकऱ्यांनी आता घरचेच बियाणे उपलब्ध करण्याचा पर्याय निवडावा असे आवाहन तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे यांनी केले आहे़  महागाव तालुक्यातील वेणी(बु) येथील शेतकरी रमेश पुंडे यांनी खरीप हंगामासाठी सोयाबीनचे बियाणे उपलब्ध व्हावे म्हणून तुरीचे पीक निघाल्यानंतर दोन एकर मध्ये सोयाबीनची पेरणी केली़ सोयाबीनचे उत्तम पीक आल्याचे पाहुन तालुका कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले़ माळकिन्ही शिवारात सुद्धा मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याने सोयाबीनची पेरणी केली असून हेच बियाणे म्हणून खरीप हंगामात शेतकऱ्यांना उपयोगी पडू शकते़ त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी जर घरचेच बियाणे उपलब्ध केले तर शेतकऱ्यांचा बी-बियाण्यावर होणारा खर्चही कमी होईल आणि फसवणूक होणार नाही, असे मत तालुका कृषी अधिकारी विजय मुखाडे यांनी व्यक्त केले़ यावेळी कृषी सहाय्यक अतुल राठोड, डि.जी.साबणे तसेच शेतकरी गजानन गुंजर, प्रमोद जाधव उपस्थित होते़