आश्चर्यच ! फक्त २ इंचाची गणेशमूर्ती

  • महाराष्ट्रातील सर्वांत लहान गणेशमूर्ती असल्याचा दावा

यवतमाळ : कोरोनामुळे संपूर्ण राज्यात गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने साजरा केला जात आहे. या दरम्यान यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील अंबिका नगर ओम गणेश मंडळाने चक्क दोन इंच उंचीच्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. आता हे इवलेसे गणपत्ती बाप्पा राज्यभरातील गणेश भक्तांसाठी चर्चेचा विषय ठरत आहे.

गणेशोत्सव म्हटले की, आबाल वृद्धांच्या आनंदाला उधाण येते; मात्र यावर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्यातील सर्वच सार्वजनिक गणेश मंडळाला गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. मंडळांनी ४ फुटांपेक्षा लहान गणेश मूर्तीची स्थापना करावी, असे निर्देश राज्य शासनाकडून देण्यात आले आहे. याला भक्तांकडून चांगला प्रतिसादही मिळत आहे. याच पार्श्व् भूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील अंबिका नगरच्या ओम गणेश मंडळाने चक्क दोन इंच उंचीच्या लहानशा गणेश मूर्तीची स्थापना करून आगळा वेगळा आदर्श निर्माण केला. दारव्हा येथील मूर्तिकार शशांक वानखडे यांनी नाममात्र एक रुपयात शाडू मातीची सुंदर गणेश मूर्ती साकारली आहे. हे बघून ‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ या उक्तीचा प्रत्यय येत आहे. ओम गणेश मंडळाने शेतकरी नामदेवराव टेकाम यांचे हस्ते मूर्तीची स्थापना करीत सामाजिक बांधिलकी जपली. मंडळातील सदस्यांतर्फे परिसरात सॅनिटायजरची फवारणी करून गणरायांचे स्वागत करण्यात आले.

ओम गणेशोत्सव मंडळाने यंदा दशकपूर्ती केली असून त्यांच्यामार्फत दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. याआधी त्यांनी गणेशोत्सव काळात शेतकरी आत्महत्या, आतंकवाद, बेटी बचाव, बेटी पढाओ, वृद्धाश्रम, वृक्षारोपण आदी ज्वलंत विषयावर विलोभनीय दृश्य साकारत सामाजिक प्रबोधन केले. यासह सामान्य ज्ञान स्पर्धा, गरजूंना ब्लँकेट वाटप, अन्नदान, वृक्षारोपण, देशभक्तीपर गीतसंध्या आदी उपक्रम राबविण्यात आले. यंदा कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर जनजागृती करण्यात येणार असल्याचे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. ओम गणेश मंडळाचे अध्यक्ष जीवन काळे, उपाध्यक्ष संदीप शिले, सचिव स्वप्नील राठोड, कोषाध्यक्ष प्रविण राऊत, विलास शिले, किशोर राऊत, महेश दंडे, अमोल ठोंबरे, राहुल इंगोले, अभिषेक गांवडे, निखील मडसे, किशोर जवके, अमोल राठोड़, राजेश पराळे आदी कार्यकर्ते दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमात सहभागी होतात.