दिल्लीच्या राजकारणाला धडा शिकवा; संभाजी ब्रिगेडची मराठी माणसांना हाक

देशांमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची निवडणूक आता चर्चेमध्ये आहे़. या निवडणुकीमध्ये ममता दीदीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि वामपंथी दल मैदानात उतरले आहेत.

  • ममता बॅनर्जी यांना संभाजी ब्रिगेडचे समर्थन

यवतमाळ (Yavatmal).  देशांमध्ये सर्वाधिक महत्त्वाच्या असणाऱ्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालची निवडणूक आता चर्चेमध्ये आहे़. या निवडणुकीमध्ये ममता दीदीच्या विरोधामध्ये भारतीय जनता पार्टी, काँग्रेस आणि वामपंथी दल मैदानात उतरले आहेत. पश्चिम बंगालमधील मराठी माणसांना दिलासा मिळावा व त्याठिकाणी असणाऱ्या सर्व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी आता ममता दीदींचा झेंडा खांद्यावर घेतला आहे. दिल्लीच्या राजकारणाला एकदा धडा शिकवा, अशा प्रकारची आग्रही भूमिका ठेवत यवतमाळ जिल्हा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुरज खोब्रागडे व सचिन मनवर त्यांनी मराठी माणसांना आवाहन केले आहे़.

यवतमाळ जिल्ह्यामध्ये असणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या वतीने आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी स्पष्ट केले की, सध्या देशाला वेगळ्या दिशेने नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे केंद्रातील सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधात असून आरक्षणाच्या संदर्भात सुद्धा भूमिका स्पष्ट करणारी नाही़. पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये शेतकरी आंदोलन, आरक्षण आणि बंगालमधील समस्या या तिन्ही मुद्द्यांवर तीन निवडणुका होत असताना बँकांमध्ये बहुतांशी महाराष्ट्रातील मराठी माणूस काम करीत आहे़.

त्या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मायेची हाक दिली आहे़. येत्या काळामध्ये मराठी माणसांनी ममता बॅनर्जी यांच्या मागे भक्कमपणे उभे राहावेत आणि केंद्रातील सरकारला धडा शिकवावा, अशा प्रकारचे आवाहन यावेळी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आले़.

‘अभी नही तो कभी नही’
यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये केंद्रातील सरकारला धडा शिकवणे गरजेचे आहे. याकरिता पश्चिम बंगालमधील निवडणूक महत्त्वपूर्ण निवडणूक ठरणार असून या निवडणुकीने संपूर्ण देशातील राजकारणाला एक वेगळे वळण लागणार आहे़. त्यामुळे सर्व मराठी माणसांनी व संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी ममता बॅनर्जी यांच्या मागे उभे राहावे, असे आवाहन करण्यात आले.
—  सुरज खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष, संभाजी ब्रिगेड यवतमाळ