फोटो सौजन्य- सोशल मीडिया
KPSC Exam Scam: कर्नाटकात सरकारी भरती परीक्षेत मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. कर्नाटक लोकसेवा आयोग (KPSC) च्या पशुचिकित्सा अधिकारी भरती परीक्षेत सहभागी झालेल्या काही उमेदवारांना परीक्षेच्या बरोबर एक दिवस आधीच प्रश्नांची उत्तरे उपलब्ध करून देण्यात आल्याचा आरोप अंमलबजावणी संचालनालयाने (ED) केला आहे. या बदल्यात उमेदवारांकडून लाखो रुपयांची लाच घेतल्याचा संशय आहे.
तपास यंत्रणेनुसार, उमेदवारांना बंगळुरूच्या बाहेरील भागातील एका रिसॉर्टमध्ये नेण्यात आले होते, जिथे त्यांना प्रश्नपत्रिका आणि योग्य पर्याय देण्यात आले. त्यांना हे सर्व उत्तरे पाठ करण्यास सांगण्यात आले होते. पशुचिकित्सा अधिकाऱ्यांच्या ४०० पदांसाठी ही परीक्षा ८ आणि ९ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली होती. ईडीच्या तपासात अशा १० यशस्वी उमेदवारांची ओळख पटली आहे, ज्यांना कथितरित्या लीक झालेले परीक्षा साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते.
या संपूर्ण व्यवस्थेपोटी प्रत्येक उमेदवाराकडून ४० ते ५० लाख रुपयांपर्यंतची रक्कम घेतल्याचा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. परीक्षेत उत्तीर्ण करणे आणि निवड निश्चित करण्याच्या नावाखाली ही रक्कम वसूल करण्यात आली होती. ईडीने असेही सांगितले की, ६ उमेदवारांना परीक्षेच्या काही वेळ, त्यांच्यासाठी विशेष तयार केलेली ‘आंसर की’ (उत्तरपत्रिका) देण्यात आली होती. या बदल्यात त्यांच्याकडून २० ते ४० लाख रुपयांपर्यंतची लाच घेतल्याचा आरोप आहे.
ईडीच्या तपासात तत्कालीन KPSC चे परीक्षा नियंत्रक आणि आयएएस अधिकारी ग्यानेंद्र कुमार गंगवार यांचे नाव समोर आले आहे. त्यांच्याकडे परीक्षेशी संबंधित गोपनीय साहित्य होते आणि त्यांनी आपला सहकारी बसवराज कन्नालेच्या माध्यमातून प्रश्नपत्रिका लीक केल्याचा आरोप यंत्रणेने केला आहे. तपास यंत्रणेनुसार, कन्नाले उमेदवारांशी संपर्क साधण्यात आणि त्यांच्याकडून पैसे गोळा करण्यात सहभागी होता. परीक्षेत निवड करून देण्याच्या बदल्यात त्याने प्रत्येक उमेदवाराकडून ४० ते ५० लाख रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणात ईडीने गंगवार आणि कन्नाले यांना अटक केली आहे. गंगवार यांना १८ सप्टेंबर रोजी तर कन्नाले यांना त्याहून एक दिवस आधी कोठडीत घेण्यात आले होते.
या प्रकरणात ईडीने KPSC चे निलंबित अध्यक्ष शिवशंकरप्पा सहूकार आणि आयोगाच्या सदस्या बी. व्ही. गीता यांनाही अटक केली आहे. गीता यांनी गंगवार यांच्याकडून लीक झालेली उत्तरपत्रिका मिळवली होती आणि एका उमेदवाराकडून ४० लाखांच्या लाचेपैकी २० लाख रुपये ॲडव्हान्स म्हणून घेतले होते, असा आरोप तपास यंत्रणेने केला आहे. दुसरीकडे, सहूकार यांच्यावर एका उमेदवाराकडून २० लाखांच्या लाचेपैकी १० लाख रुपये ॲडव्हान्स घेण्याचा आरोप आहे. ईडीने ६ ऑक्टोबर रोजी माजी अध्यक्षांच्या आणि सदस्याच्या ठिकाणांवर धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर या दोघांना अटक करण्यात आली.
CSIR UGC NET Dec 2026 नोंदणी सुरू! बायोटेक्नॉलॉजीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठा बदल; पाहा संपूर्ण डिटेल
तपासादरम्यान ईडीला एका यशस्वी उमेदवाराकडे ८० लाख रुपयांचे कोरे सही केलेले चेक आणि कोऱ्या सही केलेल्या प्रॉमिसरी नोट (दस्तऐवज) सापडले आहेत. तपास यंत्रणेच्या मते, हे दस्तऐवज कथित लाचखोरीच्या व्यवहाराशी संबंधित तपासात अत्यंत महत्त्वाचे आहेत. कर्नाटक पोलिसांनी पशुचिकित्सा अधिकारी भरती प्रकरणाबाबत दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे ही तपासणी केली जात असल्याचे तपास यंत्रणेने स्पष्ट केले आहे.






