अमेरिकेतील शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होणार; यावर्षी भारतीय विद्यार्थ्यांना विक्रमी व्हिसा मिळणार!

Student Visa : अमेरिकेत शिक्षण घेण्यासाठी जाण्याचा विचार करणाऱ्यांना यावर्षी व्हिसा मिळण्याची शक्यता आहे. भारतातील अमेरिकी दूतावासाने यावर्षी विक्रमी संख्येने भारतीय विद्यार्थ्यांना व्हिसा देण्याचे संकेत दिले आहे.
education in america Indian students get record number of visas
Published on: 
Updated on: 

विदेशात शिक्षण घेणे हे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, आपल्या आवडत्या देशामध्ये शिक्षण घेण्याची संधी मिळाली तर 'सोने पे सुहागा' मानले जाते. त्यामुळेच आता अमेरिकेत शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसामध्ये यावेळी वाढ होण्याचे संकेत मिळाले आहे. भारतातील अमेरिकी दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांच्या व्हिसा अर्जांच्या संभाव्य वाढीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.

मागील वर्षीपेक्षा अधिक व्हिसा मिळणार

याशिवाय अमेरिकी दूतावासातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने म्हटले आहे की, यावर्षी भारतीय विद्यार्थ्यांना मागील वर्षी इतके किंवा त्याहून अधिक व्हिसा दिले जाण्याची शक्यता आहे. मागील वर्षी एकूण 1,40,000 विद्यार्थ्यांना अमेरिकेत शिक्षणासाठी व्हिसा देण्यात आला होता. त्यामुळे आता यंदा 1,40,000 विद्यार्थ्यांना किंवा त्याहून अधिक विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अमेरिकी व्हिसा मिळणार आहे. भारतात अमेरिकी मिशनने गुरुवारी देशभरात आठवा विद्यार्थी व्हिसा दिवस साजरा केला. यावेळी नवी दिल्ली, चेन्नई, हैद्राबाद, कोलकाता, आणि मुंबई या ठिकाणी अमेरिकी दूतावासातील अधिकाऱ्यांनी व्हिसासाठीच्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या त्यावेळी ही माहिती समोर आली आहे.

दररोज 4,000 विद्यार्थ्यांच्या मुलाखती

दिल्ली येथील अमेरिकी दूतावासासमोर सकाळपासून विद्यार्थ्यांची मोठी रांग दिसून आली होती. अमेरिकी विद्यापीठयांमध्ये मोठया प्रमाणात भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतात. मागील वर्षी अमेरिकी दूतावासाने भारतातील एकूण 1,40,000 विद्यार्थ्यांना शैक्षणिक व्हिसा जारी केलेला होता, जो कोणत्याही देशांपेक्षा अधिक होता. अमेरिकी वाणिज्य दूतावासातील कार्यवाहक महावाणिज्यदूत सैयद मुजतबा अंद्राबी यांनी म्हटले आहे की, दिवसभरात एकूण 4,000 विद्यार्थ्यांची व्हिसासाठी मुलाखत होणार आहे.

'ही' तर आमची सर्वोच्च प्राथमिकता

त्यांनी म्हटले आहे की, विद्यार्थ्यांना व्हिसा देणे ही आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. भारत आणि अमेरिकी या दोन्ही देशांमधील शिक्षण आणि आदानप्रदान करारातील हा महत्वाचा मुद्दा आहे. मागील वर्षी अमेरिकी दूतावासाकडून विक्रमी 1,40,000 व्हिसा जारी करण्यात आले होते. जी आतापर्यंची विक्रमी संख्या आहे. यावर्षी ही संख्या आणखी वाढणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.

अमेरिकेत शिक्षण घेणाऱ्या भारतीयांच्या संख्येत मोठी वाढ

अमेरिकी दूतावासाने म्हटले आहे की, मागील तीन वर्षांपासून अमेरिकेमध्ये शिक्षण घेण्याच्या पर्याय निवडणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अमेरिकी मिशनने वर्ष 2018, 2019 आणि 2020 या तीन वर्षांमध्ये जारी केलेल्या एकूण व्हिसा इतके शैक्षणिक व्हिसा एकट्या २०२३ मध्ये भारतीय विद्यार्थ्यांसाठी जारी करण्यात आले आहे.