Coconut Oil Flooring: नारळाच्या तेलापासून तयार होतंय घराचं फ्लोरिंग! दक्षिण भारतातील अनोखी पद्धत पाहून व्हाल थक्क

घराच्या सजावटीमध्ये सध्या पारंपरिक आणि नैसर्गिक साहित्यापासून तयार होणाऱ्या फ्लोरिंगला पसंती मिळत आहे. केरळमधील पारंपरिक कावी फ्लोरिंगमध्ये चुना, लाल आयर्न ऑक्साइड आणि पाण्याचा वापर केला जातो. या फरशीला नैसर्गिक चमक देण्यासाठी नारळाच्या तेलाने पॉलिश केले जाते.
Coconut Oil Flooring:   (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Coconut Oil Flooring: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 
  1. कावी फ्लोरिंगमध्ये चुना, लाल आयर्न ऑक्साइड आणि पाण्याचा वापर होतो.

  2. नारळाच्या तेलाने फरशीला नैसर्गिक चमक आणली जाते.

  3. कावी आणि ऑक्साइड फ्लोरिंग घराला पारंपरिक आणि आकर्षक लुक देतात.

घर बांधताना सगळेच भिंतींचा रंग, फर्निचर, सजावट आणि फरशीच्या डिझाईनकडे खास लक्ष देतात. घराच्या सौंदर्यात फरशीचा वाटा खूप मोठा असतो. त्यामुळे बरेचजण घरासाठी महागड्या टाईल्स, मार्बल किंवा ग्रॅनाईटची निवड करतात. पण, सध्या पारंपरिक बांधकाम पद्धती आणि नैसर्गिक साहित्याकडे पण बऱ्याच लोकांचं लक्ष जातं.

दक्षिण भारतातल्या पारंपरिक घरांमध्ये दिसणारं कावी फ्लोअरिंग आणि ऑक्साईड फ्लोअरिंग याचाच एक भाग आहे. विशेष म्हणजे, या पारंपरिक फ्लोअरिंगच्या फिनिशिंग आणि देखभालीमध्ये नारळाच्या तेलाचा उल्लेख केला जातो. त्यामुळे नारळाच्या तेलाच्या वापराने तयार होणाऱ्या या खास फ्लोअरिंगबद्दल बऱ्याच जणांना उत्सुकता वाटते. साधेपणा, पारंपरिक लुक आणि वेगळेपणा आवडणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरू शकतो.

• काय आहे कावी फ्लोअरिंग?

कावी फ्लोअरिंग ही केरळातली पारंपरिक बांधकाम पद्धतींपैकी एक मानली जाते. ही पद्धत साधारण 300 वर्षांपूर्वीपासून चालत आल्याचं सांगितलं जातं. या फ्लोअरिंगमध्ये चुना, लाल आयर्न ऑक्साईड आणि पाणी यांचा वापर करून फरशीचा पृष्ठभाग तयार केला जातो. त्यामुळे फरशीला लालसर, तपकिरी रंगाची आकर्षक छटा मिळते.या फ्लोअरिंगचं वैशिष्ट्य म्हणजे त्याचा गुळगुळीत आणि चमकदार पृष्ठभाग. फरशीचा थर व्यवस्थित तयार झाल्यावर कारागीर त्यावर नारळाच्या तेलाचा वापर करून बराच वेळ घासून पॉलिश करतात. त्यामुळे फरशीला नैसर्गिक चमक येते. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने केल्यास फरशीचा रंग जास्त खुलून दिसतो.

• नारळाच्या तेलाचा नेमका वापर कशासाठी होतो?

या फ्लोअरिंगबद्दल सगळ्यात जास्त उत्सुकता निर्माण करणारी गोष्ट म्हणजे नारळाच्या तेलाचा वापर. बऱ्याच जणांना वाटू शकतं की ही पूर्ण फरशी नारळाच्या तेलापासूनच तयार केली जाते. मात्र, तसं नाही. फरशी तयार करायला चुना, आयर्न ऑक्साईड आणि पाणी यांसारख्या साहित्याचा वापर होतो.

नारळाचं तेल प्रामुख्याने फरशीला पॉलिश करायला वापरलं जातं. पारंपरिक पद्धतीमध्ये कारागीर नारळाच्या करवंटीच्या तंतूंच्या मदतीने तेल लावून पृष्ठभाग घासतात. त्यामुळे फरशी जास्त गुळगुळीत आणि चमकदार दिसते. या पद्धतीत मशीनपेक्षा हाताने केलेल्या कामाला जास्त महत्त्व असतं. त्यामुळे प्रत्येक फरशीला एक वेगळाच पारंपरिक लुक मिळतो.

• नैसर्गिक थंडावा हे फ्लोअरिंगचं वैशिष्ट्य

दक्षिण भारतातलं हवामान उष्ण आणि दमट असल्यामुळे घराचं बांधकाम करताना नैसर्गिक थंडावा देणाऱ्या साहित्याला खास महत्त्व दिलं जायचं. कावी फ्लोअरिंगची पृष्ठभागाची रचना आणि त्यात वापरलं जाणारं चुना-आधारित साहित्य यामुळे फरशी पायांना तुलनेने थंड जाणवू शकते. विशेष म्हणजे, उन्हाळ्याच्या दिवसांत घरातल्या फरशीवर चालताना गारवा जाणवणं हा या पारंपरिक फ्लोअरिंगचा आकर्षक पैलू आहे. मात्र, घरातलं प्रत्यक्ष तापमान फक्त फरशीवर नाही, तर घराची दिशा, खिडक्यांची रचना, हवा खेळती राहणं आणि छताचं साहित्य अशा बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असतं.

.• ऑक्साईड फ्लोअरिंग आणि कावी फ्लोअरिंगमध्ये काय फरक आहे?

अनेकदा कावी फ्लोअरिंग आणि ऑक्साईड फ्लोअरिंग या दोन्ही प्रकारांची नावं एकत्र घेतली जातात. मात्र, त्यांच्यात काही फरक आहेत. ऑक्साईड फ्लोअरिंगमध्ये सिमेंट, वाळू आणि रंग द्यायला आयर्न ऑक्साईड पिगमेंटचा वापर केला जातो. लाल, काळा, हिरवा अशा वेगवेगळ्या रंगांमध्ये हे फ्लोअरिंग तयार करता येतं. दुसरीकडे, पारंपरिक कावी फ्लोअरिंगमध्ये चुना आणि लाल आयर्न ऑक्साईड यांसारख्या साहित्याचा वापर केला जातो. त्यावर नारळाच्या तेलाने पॉलिश करायची पारंपरिक पद्धत पण प्रसिद्ध आहे.

• घराला मिळतो पारंपरिक आणि आकर्षक लुक

आजकाल घराच्या इंटिरिअरमध्ये नैसर्गिक रंगसंगती आणि पारंपरिक डिझाईनला पसंती दिली जातेय. अशावेळी कावी फ्लोअरिंग घराला एक वेगळंच सौंदर्य देऊ शकतं. याचा लालसर तपकिरी रंग घराच्या भिंती, लाकडी फर्निचर आणि पारंपरिक सजावटीसोबत छान दिसतो. विशेषतः लाकडी दरवाजे, खिडक्या, पारंपरिक झुंबर, मातीच्या वस्तू आणि इनडोअर रोपांची सजावट असलेल्या घरांमध्ये हे फ्लोअरिंग जास्त खुलून दिसू शकतं. आधुनिक इंटिरिअरमध्ये पण साध्या भिंती आणि मिनिमल फर्निचरसह याचा वापर केल्यास घराला आकर्षक आणि उबदार लुक मिळू शकतो.

• या फ्लोअरिंगचे आणखी काही फायदे

नैसर्गिक साहित्याचा वापर : पारंपरिक कावी फ्लोअरिंगमध्ये चुना, आयर्न ऑक्साईड आणि पाणी यांसारख्या साहित्याचा वापर केला जातो. त्यामुळे कृत्रिम डिझाईनपेक्षा नैसर्गिक लुक पसंत करणाऱ्यांसाठी हा पर्याय आकर्षक ठरतो.

जोड नसलेला पृष्ठभाग : योग्य पद्धतीने तयार केलेल्या फ्लोअरिंगमध्ये टाईल्सप्रमाणे बरेच सांधे दिसत नाहीत. त्यामुळे घराला एकसंध आणि स्वच्छ लुक मिळतो.

वेगळ्या रंगाची निवड : या फ्लोअरिंगचा लालसर तपकिरी रंग घराला पारंपरिक सौंदर्य देतो. तर ऑक्साईड फ्लोअरिंगमध्ये वेगवेगळ्या रंगांचे पर्याय उपलब्ध असतात.