फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Shocking Work Trend in China: थोडा विचार करा, नोकरीच्या शोधात असलेल्या एखाद्या तरुणाला फक्त ऑफिसमध्ये जाण्यासाठी स्वतःचे पैसे खर्च करावे लागले तर? चीनमधील रोजगार संकटामुळे काही तरुणांच्या आयुष्यात ही कल्पना प्रत्यक्षात आली आहे. हातात कोणतीही नोकरी नसताना हे तरुण दररोज घरून निघून अशा ऑफिसमध्ये पोहोचतात, जिथे त्यांना ना कोणताही पगार मिळतो आणि ना कोणत्या कंपनीचे काम करावे लागते. उलट, ऑफिसमध्ये बसण्यासाठी त्यांना स्वतःच्या खिशातून पैसे द्यावे लागतात.
सध्या चीनमध्ये ‘प्रिटेंड टू वर्क’ हा ट्रेंड जोरदार चर्चात आहे. जेन-झी युवा स्वतःचे पैसे खर्च करून काम करण्याचा दिखावा करण्यासाठी आणि ऑफिसचे वातावरण मिळवण्यासाठी भाड्याने ऑफिस घेत आहेत. वेगाने चाललेल्या या ट्रेंड अंतर्गत बेरोजगार तरुण लॅपटॉप घेऊन तासन् तास डेस्कवर बसतात, नोकरीसाठी अर्ज करतात, रेझ्युमे तयार करतात, स्वतःच्या स्टार्टअप किंवा इतर प्रोजेक्टवर काम करतात आणि रोजगार शोधत असलेल्या लोकांशी संवाद साधतात. या बदल्यात त्यांना कॉम्प्युटर, इंटरनेट, स्नॅ्क्स, लंच आणि ड्रिंक्ससारख्या सुविधा मिळतात. यामुळे या तरुणांकडे नोकरी नसली, तरी ऑफिसचे वातावरण नक्कीच मिळते.
‘फॉर्च्यून’ (Fortune) च्या रिपोर्टनुसार, या जागांवर बसण्यासाठी तरुणांना दररोज जवळपास ३० ते ५० युआन म्हणजेच सुमारे ४०० ते ६७० रुपयांपर्यंत खर्च करावे लागतात. सुरुवातीला हा एक नगण्य खर्च वाटतो, पण दीर्घकाळात बेरोजगार तरुणांसाठी ही रक्कम मोठी ठरू शकते. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, पैसे देऊन हे तरुण कधीतरीच नाही, तर शनिवार आणि रविवार वगळून सोमवार ते शुक्रवार नियमितपणे ऑफिसमध्ये जातात.
रिपोर्टनुसार, नियमितपणे रेंटेड ऑफिसचा वापर केल्यामुळे त्या तरुणांचा वार्षिक खर्च सुमारे १,८२० डॉलर म्हणजेच सुमारे १,७४,२५४.९० रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. इतका खर्च होत असूनही हे तरुण या ठिकाणांचा आधार घेत आहेत. घरी एकटे बसून नोकरी शोधण्याच्या तुलनेत येथे अधिक शिस्तबद्ध आणि सक्रिय वातावरण मिळते, असा त्यांचा विश्वास आहे.
चीनमधील या खोट्या ऑफिसमध्ये तरुणांना वास्तविक कंपनीसारख्या अनेक मूलभूत सुविधा दिल्या जातात. जसे की कॉम्प्युटर आणि काम करण्याची जागा, इंटरनेट, स्नॅ्क्स आणि ड्रिंक्स, लंच, मीटिंग किंवा गप्पा मारण्यासाठी स्पेस, इतर नोकरी शोधणाऱ्या तरुणांना भेटण्याची संधी इत्यादी. येथे राहून काही तरुण नोकरीचे अर्ज भरतात, तर काहीजण त्यांच्या स्टार्टअप किंवा फ्रीलान्स प्रोजेक्टवर काम करतात. अशा प्रकारे हे ठिकाण बेरोजगार तरुणांसाठी एक प्रकारचे वर्कस्पेस आणि सोशल नेटवर्किंग स्पेस बनले आहे.
रिपोर्टनुसार, अशा प्रकारचे ऑफिस चीनच्या नानजिंग, शांघाई, वुहान, शेन्झेन, चेंगदू आणि कुनमिंग यांसारख्या शहरांमध्ये पाहायला मिळत आहेत. बेरोजगारीच्या काळात घरी दीर्घकाळ एकटे राहिल्यामुळे तरुणांच्या दैनंदिन आणि सामाजिक जीवनावरही परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत काही तरुण ऑफिससारखे वातावरण निवडतात जेणेकरून ते दररोज एक दिनचर्या कायम ठेवू शकतील.
चीनमध्ये तरुणांची बेरोजगारी हा दीर्घकाळापासून चिंतेचा विषय राहिला आहे. आकडेवारीनुसार, १६ ते २४ वयोगटातील तरुणांमधील बेरोजगारीचा दर १४.५% पर्यंत असल्याचे सांगण्यात आले आहे. तथापि, चीनमधील युवा बेरोजगारीच्या आकडेवारीवरून बऱ्याच काळापासून चर्चा सुरू आहे. २०२३ मध्ये पेकिंग युनिव्हर्सिटीचे अर्थशास्त्र प्राध्यापक झांग डांडान यांनी युवा बेरोजगारीचा एक वैकल्पिक अंदाज सुमारे ४६.५% वर्तवला होता, जो अधिकृत आकडेवारीपेक्षा खूपच जास्त होता.
एकतर्फ बेरोजगार तरुण स्वतः पैसे खर्च करून ऑफिससारखे वातावरण मिळवत आहेत, तर दुसरीकडे चीनमध्ये काही असेही तरुण आहेत जे ‘रॅट पीपल्स’ आणि ‘लायिंग फ्लॅट’ सारख्या ट्रेंडचा भाग बनत आहेत. या अंतर्गत तरुणांना घरीच राहून फोन चालवणे, झोपणे आणि खाणे ऑर्डर करण्यात वेळ घालवणे आवडते. तसेच, काही तरुण असे आहेत जे करिअरबद्दल फारसा ताण घेत नाहीत, त्यांच्यासाठी करिअर आणि आर्थिक यशाची शर्यत फारशी महत्त्वाची नसते. ते कमीत कमी प्रयत्न असणाऱ्या जीवनशैलीला प्राधान्य देतात.
रिपोर्टनुसार, चीनच्या शिक्षण मंत्रालयाने २०११ मध्ये चेतावनी दिली होती की, ज्या कॉलेजमध्ये सलग २ वर्षे एखाद्या कोर्सचा रोजगार दर ६० टक्क्यांपेक्षा कमी राहिल, त्यांचे प्रोग्राम बंद केले जाऊ शकतात. यानंतर काही विद्यापीठांवर आपल्या ग्रॅज्युएट्सची रोजगार स्थिती सुधारलेली दाखवण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप झाले. काही अहवालांमध्ये असाही दावा करण्यात आला की, रोजगाराची आकडेवारी सुधारण्यासाठी कॉलेजांनी स्वतःच्याच माजी विद्यार्थ्यांची तात्पुरत्या स्वरूपात नियुक्ती केली.






