संग्रहित फोटो
एका महीलेचा जागीच मृत्यू
मिळालेल्या माहितीनुसार, बिलाखेड गावाजवळून महिला जात असताना भरधाव कारने त्यांना जोरदार धडक दिली. धडकेनंतर तीनही महिला रस्त्यावर कोसळल्या. यातील एका महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर अन्य दोन महिला गंभीर जखमी झाल्या. अपघातानंतर कारमधील परिस्थितीही गंभीर होती. मृत महिला कारमध्ये अडकून पडल्याने तिला बाहेर काढण्यासाठी स्थानिक नागरिक आणि पोलिसांना प्रयत्न करावे लागले.
दोन महीलांची प्रकृती गंभीर
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. गंभीर जखमी झालेल्या दोन्ही महिलांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे. दरम्यान, अपघातातील मृत महिलेची ओळख पटविण्याचे आणि घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले.
ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन
या अपघातानंतर बिलाखेड गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. रस्त्यावर वारंवार अपघात होत असून, वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. संतप्त ग्रामस्थांनी चाळीसगाव-मालेगाव रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू केले.
आंदोलनामुळे वाहतुक ठप्प
रस्त्यावर तातडीने स्पीड ब्रेकर बसवावेत, वाहनचालकांना सावध करण्यासाठी सुरक्षा आणि सूचना फलक लावावेत, तसेच अपघातप्रवण ठिकाणी आवश्यक सुरक्षाव्यवस्था करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. आंदोलनामुळे चाळीसगाव-मालेगाव मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. त्यामुळे परिसरात काही काळ तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.
चर्चेने आंदोलन घेतले मागे
पोलिसांनी आंदोलनकर्त्या ग्रामस्थांशी चर्चा करून त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या. आवश्यक त्या उपाययोजनांसाठी संबंधित विभागाशी चर्चा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी रास्ता रोको मागे घेतला. त्यानंतर वाहतूक हळूहळू सुरळीत करण्यात आली. दरम्यान, अपघात नेमका कोणत्या कारणामुळे झाला, कारचा वेग किती होता आणि चालकाचा वाहनावरील ताबा कशामुळे सुटला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.






