संग्रहित फोटो
रीलसाठी महामार्गावरच स्टंटबाजी
मिळालेल्या माहितीनुसार, बालेवाडी ते भुजबळ चौक, वाकडच्या दिशेने जाणाऱ्या पुणे-बंगळुरू महामार्गावर हा प्रकार घडला असुन काही तरुण नवीन खरेदी केलेल्या गाडीचा रील व्हिडिओ तयार करण्यासाठी महामार्गावर आले होते. त्या तरुणांनी गाडी भररस्त्यात उभी करुन तिचे फोटो काढण्यास सुरू केले.यावेळी महामार्गावरील इतर वाहनांच्या वाहतुकीचा कोणताही विचार करण्यात आला नसल्याचे दिसून आले. तसेच महामार्गावर वाहनांची मोठी वर्दळ असतानाही गाडी रस्त्यात उभी करण्यात आली होती. त्यामुळे मागून येणाऱ्या वाहनांना पुढे जाण्यास अडथळा निर्माण झाला आणि काही मिनिटांतच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आणि वाहतुकीचा खोळंबा झाला.
वाहनचालकांना मनस्ताप
रील बनवण्यासाठी केलेल्या या प्रकारामुळे अनेक वाहनचालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. महामार्गावर अचानक गाडी थांबवल्याने अपघाताची शक्यताही निर्माण झाली होती. आपत्कालीन परिस्थितीत जाणाऱ्या वाहनांनाही याचा फटका बसू शकला असता. सोशल मीडियासाठी काही मिनिटांचा व्हिडिओ तयार करण्यासाठी इतर नागरिकांचा वेळ आणि सुरक्षितता धोक्यात घालण्यात आल्याने या प्रकाराबाबत संताप व्यक्त होत आहे.
व्हिडिओ व्हायरल
तरुणांची ही स्टंटबाजी काही नागरिकांच्या कॅमेऱ्यात कैद झाली. त्यानंतर संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. व्हिडिओमध्ये महामार्गावर गाडी थांबवून चित्रीकरण केले जात असल्याचे दिसत आहे. या प्रकाराची माहिती मिळताच बावधन पोलिसांनी त्याची गंभीर दखल घेतली.
पोलिसांकडून शोध सुरू
महामार्गावरील वाहतूक रोखून इतरांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण करणाऱ्या तरुणांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. व्हिडिओच्या आधारे गाडीचा क्रमांक आणि संबंधित व्यक्तींची माहिती मिळवण्याचे काम सुरू आहे. दोषी आढळल्यास संबंधितांवर वाहतूक नियमांचे उल्लंघन तसेच सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. रील्स आणि सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्याच्या नादात सार्वजनिक रस्त्यांवर स्टंटबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जात असतानाही अशा घटना वारंवार घडत आहेत. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते, याकडे आता लक्ष लागले आहे.






