संग्रहित फोटो
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत हरिश्चंद्र दाभाडे (वय ६५, रा. वैजापूर) असे या अपघातात प्राण गमावलेल्या दुर्दैवी ज्येष्ठाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ट्रॅव्हल्स बस प्रवाशांना घेऊन वेगाने जात असताना वैजापूर परिसरातील समृद्धी महामार्गावर चालकाचा वाहनावरील अचानक ताबा सुटला. चालक काही समजण्यापुर्वीच भरधाव बस पुढे जाणाऱ्या मालवाहतूक कंटेनरवर जाऊन मोठ्या वेगाने आदळली. धडकेचा आवाज एवढा मोठा होता की, आजूबाजूच्या परिसरातील नागरिक तातडीने मदतीसाठी घटनास्थळाकडे धावले. अपघातानंतर बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांचा मोठा आक्रोश आणि प्रचंड गोंधळाचे वातावरण महामार्गावर निर्माण झाले होते.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थ आणि महामार्ग पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचाव कार्य सुरू केले. बसच्या ढिगाऱ्यात आणि तुटलेल्या भागांमध्ये अडकलेल्या जखमी प्रवाशांना अनेक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीने रुग्णवाहिकेच्या साहाय्याने वैजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींपैकी २ ते ३ प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून त्यांच्यावर अतिद दक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात हा अपघात बसच्या अतिवेगामुळे आणि चालकाच्या निष्काळजीपणामुळेच घडल्याचे समोर येत आहे. अपघाताची नोंद करून वैजापूर पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. समृद्धी महामार्गावर सातत्याने वेगमर्यादेचे उल्लंघन केले जात असल्यामुळे असे प्राणघातक अपघात वारंवार घडत आहेत. या ताज्या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील वाहनांचा अमर्याद वेग, लेन कटिंग आणि प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.






