Yellow Eyes Dark Urine Pale Stool Causes: शरीरात दिसणारी 'ही' 3 लक्षणं देतात गंभीर आजारांचा इशारा; कावीळ समजून दुर्लक्ष नको

डोळे पिवळे होणे, लघवी गडद होणे आणि शौचाचा रंग फिकट होणे ही काविळीची महत्त्वाची लक्षणे आहेत. मात्र, ही लक्षणे केवळ काविळीमुळेच दिसतात असे नाही. पित्ताशयातील खडे, पित्तनलिका अरुंद होणे, स्वादुपिंडाची सूज किंवा पित्ताशय, पित्तनलिका आणि स्वादुपिंडाचा कॅन्सर यामुळेही पित्ताचा प्रवाह अडून कावीळ होऊ शकते.
Yellow Eyes
Yellow Eyes (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
Published on: 
Updated on: 

Jaundice Symptoms: बऱ्याचदा डोळे, लघवी किंवा शौचाच्या रंगातला बदल आपण किरकोळ समजून सोडून देतो. पण हेच छोटे बदल कधी कधी आतमध्ये सुरू असलेल्या मोठ्या आजाराची चाहूल देतात. डोळे पिवळे होणं, लघवी जास्त गडद होणं आणि शौचाचा रंग मातीसारखा फिकट होणं, ही तिन्ही लक्षणं धोक्याची असतात. लोकं याला लगेच कावीळ किंवा लिव्हरचा प्रॉब्लेम समजतात, पण हे पित्ताची नळी, पित्ताशय किंवा स्वादुपिंड बिघडल्याचं पण लक्षण असू शकतं.

• शरीरात पित्ताचं काम काय असतं?

लिव्हरमध्ये पित्त नावाचा पाचक रस तयार होतो. आपण खाल्लेलं अन्न पचायला त्याची मदत होते. हे पित्त नळ्यांमधून पुढे जातं आणि आतड्यात सोडायच्या आधी पित्ताशयात साठून राहतं.

स्वादुपिंड हे पित्ताच्या नळीला अगदी चिकटून असतं. ते पचनासाठी लागणारे एन्झाइम्स आणि इन्शुलिन तयार करतं. पित्ताची मुख्य नळी आणि स्वादुपिंडाची नळी आतड्याच्या सुरुवातीला एकत्र उघडतात. त्यामुळे यातल्या एकाही भागाला त्रास झाला तर नळी बंद होऊन पित्त अडकतं आणि कावीळ येते.

• कावीळ कशामुळे होते?

कावीळ झाली म्हणजे कॅन्सरच असतो, असं नाही. बरीच कारणं साधी असतात आणि पूर्ण बरी पण होतात.खडे : पित्ताशयात खडे होणं खूप कॉमन आहे. कधी कधी एखादा खडा सरकून नळीत अडकतो. मग पित्ताचा प्रवाह थांबतो. त्यामुळे कावीळ, पोटदुखी, ताप आणि उलट्या सुरू होतात. कधी कधी यामुळे पित्ताशयाला किंवा स्वादुपिंडाला सूज पण येते.

नळी अरुंद होणं : खड्यांशिवाय सूज, जुनी शस्त्रक्रिया, मार लागणं किंवा इन्फेक्शनमुळे पण नळी अरुंद होऊ शकते. याला कोलँजायटिस म्हणतात. यात कावीळ, थंडी वाजून ताप आणि पोटदुखी असते. स्वादुपिंडाची सूज किंवा गाठ पण नळीवर दाब आणून अडथळा करू शकते.

कॅन्सर : कधी कधी कावीळ हे कॅन्सरचं पहिलं लक्षण असतं. स्वादुपिंडाच्या डोक्याजवळची गाठ, पित्ताशयाचा किंवा पित्तनलिकेचा कॅन्सर पित्ताचा रस्ता अडवतो. काही कारण नसताना वजन कमी होणं, भूक न लागणं, पोट-पाठ सतत दुखणं, अंगाला खाज सुटणं, कावीळ वाढत जाणं, ही त्याची लक्षणं आहेत. हे कॅन्सर सुरुवातीला दुखत नाहीत. त्यामुळे वयस्कर माणसात वेदनाविरहित कावीळ दिसली तर लगेच तपासणी करायला हवी.

• डॉक्टरकडे कधी जायचं?

डोळे-त्वचा पिवळी पडणं, लघवी गडद होणं, शौच फिकट होणं, अंगाला खाज सुटणं, याकडे दुखत नसलं तरी दुर्लक्ष करू नका. काविळीसोबत ताप, थंडी, असह्य पोटदुखी, सारख्या उलट्या, गोंधळल्यासारखं वाटणं किंवा जास्त झोप येणं असेल तर लगेच इमर्जन्सीमध्ये जा. हा गंभीर इन्फेक्शनचा इशारा असू शकतो.

• तपासणी आणि उपचार

सुरुवातीला डॉक्टर इतिहास विचारतात, तपासणी करतात आणि रक्ताच्या चाचण्या सांगतात. यात LFT, CBC आणि अमायलेस-लायपेस असतात. खडे किंवा गाठ बघायला अल्ट्रासाऊंड, सीटी स्कॅन आणि एमआरसीपी केला जातो. खडे त्रास देत असतील तर लॅपरोस्कोपीने पित्ताशय काढलं जातं. नळीतले खडे ERCP ने काढतात आणि अरुंद नळीत स्टेंट टाकतात. कॅन्सर लवकर लक्षात आला तर ऑपरेशनने तो पूर्ण बरा होऊ शकतो.म्हणून पिवळे डोळे, गडद लघवी आणि फिकट शौच याला घरगुती उपायाने बरं करायचा प्रयत्न करू नका. वेळेत HPB सर्जनला दाखवलं तर योग्य निदान आणि उपचाराने जीव वाचू शकतो.