

टेराकोटा ज्वेलरीचे प्रकार: नेकलेस, चोकर, झुमके, बांगड्या आणि पेंडंट अशा विविध डिझाइन्समध्ये हे दागिने उपलब्ध आहेत.
पारंपरिक आणि मॉडर्न स्टाइल: साडी, कुर्ती, कॉटन ड्रेस आणि इंडो-वेस्टर्न आउटफिट्सवर टेराकोटा ज्वेलरी आकर्षक दिसते.
दागिन्यांची योग्य काळजी: दागिने पाणी, परफ्यूम आणि रसायनांपासून दूर ठेवून कोरड्या कापडाने स्वच्छ करावेत.
सध्या फॅशनविश्वात पारंपरिक आणि नैसर्गिक वस्तूंपासून तयार होणाऱ्या दागिन्यांना विशेष पसंती मिळताना दिसत आहे. यामध्ये टेराकोटा ज्वेलरीचा ट्रेंड लोकप्रिय होत आहे.मातीपासून बनणारे हे दागिने त्यांच्या विविध आकारांसाठी अधिकच प्रसिद्ध आहेत. मातीपासून तयार केले जाणारे हे दागिने दिसायला आकर्षक, कलात्मक आणि वेगळे असतात. आपल्याला हवा असलेला आकार सध्या करता येतो. विशेष म्हणजे पारंपरिक साडीपासून ते मॉडर्न वेस्टर्न कपड्यांपर्यंत विविध प्रकारच्या आउटफिट्सवर हे दागिने सुंदर दिसतात. त्यामुळे कॉलेज तरुणींपासून ते नोकरदार महिलांपर्यंत अनेक जणी टेराकोटा ज्वेलरीला पसंती देत आहेत.
टेराकोटा म्हणजे भाजलेली माती. विशिष्ट प्रकारच्या चिकणमातीपासून हे दागिने तयार केले जातात. सर्वप्रथम मातीला हवा तसा आकार दिला जातो. त्यानंतर ती व्यवस्थित वाळवून भट्टीमध्ये भाजली जाते.त्याने दागिन्यांना कडकपणा येतो. पुढे त्यावर रंगकाम, नक्षीकाम आणि फिनिशिंग केले जाते. त्यामुळे या दागिन्यांना आकर्षक आणि टिकाऊ स्वरूप मिळते. अनेक कारागीर हे दागिने हाताने तयार करतात.त्यामुळे अधिकच सुंदर दिसतात.
टेराकोटा ज्वेलरीमध्ये अनेक प्रकार उपलब्ध आहेत. यामध्ये लांब नेकलेस, चोकर, झुमके, लहान कानातले, बांगड्या, पेंडंट, अंगठ्या आणि मंगळसूत्र अशा विविध दागिन्यांचा समावेश होतो. यामध्ये फुलांची नक्षी, मोर, पानांचे आकार, सूर्यफूल, भौमितिक डिझाइन आणि पारंपरिक कलाकुसर पाहायला मिळते.
टेराकोटा ज्वेलरीमध्ये लाल, काळा, पांढरा, पिवळा, हिरवा, निळा आणि मातीचा नैसर्गिक रंग वापरला जातो. काही दागिन्यांवर वारली आर्ट, मधुबनी पेंटिंग आणि पारंपरिक भारतीय नक्षीकाम केलेले असते. त्यामुळे प्रत्येक दागिन्याला वेगळा लूक मिळतो. साध्या ड्रेसवर उठावदार दिसणारे हे दागिने फॅशनप्रेमींची पसंती ठरत आहेत.तसेच हे दागिने साडीवरही छान दिसतात.
कॉटन साडी, पैठणी, खादी कुर्ती, अनारकली ड्रेस आणि इंडो-वेस्टर्न कपड्यांवर टेराकोटा ज्वेलरी छान दिसते.तसेच ऑफिससाठी छोटे कानातले किंवा साधे पेंडंट वापरता येतात.तसेच जर तुम्ही ड्रेस घालत असला तर त्यावर देखील हे दागिने सुंदर दिसतात तर सण-समारंभ आणि विशेष कार्यक्रमांसाठी मोठे नेकलेस, झुमके आणि मॅचिंग बांगड्या निवडता येतात.
हे दागिने मातीपासून तयार केले जात असल्यामुळे त्यांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. पाणी, परफ्यूम आणि रासायनिक पदार्थांपासून ते दूर ठेवावेत.ज्याने ते ओलसर होणार नाहीत. वापरल्यानंतर मऊ आणि कोरड्या कापडाने स्वच्छ करावेत. तसेच दागिने स्वतंत्र बॉक्समध्ये ठेवावेत. ते खाली पडणार नाहीत किंवा एकमेकांवर आदळणार नाहीत याची काळजी घ्यावी. पारंपरिक हस्तकला, नैसर्गिक सौंदर्य आणि आधुनिक फॅशन यांचा सुंदर संगम असलेली टेराकोटा ज्वेलरी तुमच्या लूकला आकर्षक आणि वेगळा अंदाज देऊ शकते. त्यामुळे यंदा दागिन्यांच्या कलेक्शनमध्ये या मातीच्या दागिन्यांचा समावेश करण्याचा पर्याय नक्की विचारात घ्या.