

- महाराष्ट्रातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे.
- या नवीन व्यवस्थेला 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' (Vertical Property Card) असे नाव देण्यात आले आहे.
- राज्यातील सुमारे ७ कोटींहून अधिक सदनिकाधारकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
मुंबई : राज्यातील प्रत्येक सदनिकेची स्वतंत्र मालमत्ता पत्रिका तयार करण्याचा निर्णय महसूल विभागाने घेतला आहे. 'व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या य व्यवस्थेमुळे सदनिकेचे क्षेत्रफळ, मालकी हक्क, त्यावरील बोजे आणि कायदेशीर अडचणींची नोंद स्वतंत्रपणे उपलब्ध होणार आहे. राज्यातील सुमारे 7 कोटींवर सदनिकाधारकांना या उपक्रमाचा लाभ होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली.
व्यवस्थेसाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ मध्ये सुधारणा करणार असून, नियमावलीचा मसुदा हरकती आणि सूचनांसाठी खुला करण्यात आला आहे. मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ग्रामीण भागात जमिनीच्या हक्कांची नोंद सातबारा उताऱ्यात, तर शहरी भूमापन क्षेत्रात मालमत्ता पत्रिकेत केली जाते. मात्र, इमारतीतील प्रत्येक सदनिकेच्या स्वतंत्र हक्कांच्या नोंदीसाठी राज्यभर एकसमान व्यवस्था नाही. ही उणीव दूर करण्यासाठी नवीन व्यवस्था लागू करण्यात येणार आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांचा विचार करून नियमांना अंतिम स्वरूप दिले जाईल.
व्यवस्थेत सर्वप्रथम इमारत आणि तिच्या सामायिक जागांची मुख्य नोंद केली जाईल. नंतर प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र पूरक नोंद होईल. शहरी भूमापन क्षेत्रात इमारतीसाठी 'डी-१' आणि प्रत्येक सदनिकेसाठी 'डी-२' अशी नोंद प्रस्तावित आहे. ग्रामीण तसेच अन्य क्षेत्रांत इमारतीसाठी 'आय-ए' (गाव नमुना ७-क) आणि सदनिकेसाठी 'आय-बी' (गाव नमुना ७-ड) अशी नोंद होणार आहे.
जागेसह मालकीचा तपशील एका जागी
प्रत्येक सदनिकेचा क्रमांक, धारकाचे नाव, मंजूर क्षेत्रफळ, संबंधित हक्क, बोजे आणि इमारतीच्या मंजूर आराखड्यातील क्षेत्रफळ व मोकळ्या जागेचा तपशील मालमत्ता पत्रिकेत असेल. प्रत्येक फ्लॅटला स्वतंत्र ओळख क्रमांक असेल, मंजूर बांधकाम आराखडा, संबंधित प्रमाणपत्रे व नोंदणीकृत दस्तऐवजांची पडताळणी करून नोंदी होतील. नवीन बांधकाम प्रकल्पांसाठी सक्षम नियोजन प्राधिकरणाने दिलेल्या प्रारंभ प्रमाणपत्राआधारे, तर अस्तित्वातील इमारतींसाठी भोगवटा प्रमाणपत्र आणि नोंदणीकृत दस्तऐवजांआधारे नोंदी प्रस्तावित आहेत.
व्यवस्था आणि प्रक्रिया अशी...
जमीनमालक, प्रवर्तक, विकासक, सदनिकाधारक किंवा सोसायटी अथवा संस्थेचा अधिकृत प्रतिनिधी मालमत्ता पत्रिकेसाठी अर्ज करू शकेल. अर्जानुसार मूळ हक्क नोंद, मंजूर बांधकाम आराखडा, आवश्यक प्रमाणपत्रे, हस्तांतरणपत्र किंवा अभिहस्तांतरणपत्र आणि सदनिकेच्या हक्कांशी संबंधित नोंदणीकृत दस्तऐवज सादर करावे लागतील.
बँकेचे कर्ज, गहाणखत, न्यायालयीन निर्बंध तसेच सरकारी देणी यांची नोंदही सदनिकानिहाय करण्याची तरतूद प्रस्तावित आहे. यासाठी लागू प्रक्रियेनुसार सक्षम प्राधिकरणाचे आदेश किंवा विश्वसनीय माहितीच्या आधारे नोंदी केल्या जातील.
अर्ज स्वीकारणे, माहिती संकलित करणे, आवश्यकतेनुसार जागेची पडताळणी, त्रुटींची पूर्तता, नोंदींना मान्यता व डिजिटल स्वाक्षरीसह मालमत्ता पत्रिका वितरित करणे अशी एकात्मिक डिजिटल व्यवस्था होणार आहे. नोंदणी व मुद्रांकसह संबंधित विभागांत मुदतीत माहितीची देवाणघेवाण करण्याची तरतूद असेल.
FAQ
1. राज्य सरकारने फ्लॅटधारकांसाठी कोणता महत्त्वाचा निर्णय घेतला आहे?
राज्यातील प्रत्येक सदनिकेसाठी स्वतंत्र मालमत्ता पत्रिका म्हणजेच व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला आहे.
2. व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड म्हणजे काय?
इमारतीमधील प्रत्येक फ्लॅटची स्वतंत्र मालकी, क्षेत्रफळ, बोजे आणि कायदेशीर स्थितीची माहिती नोंदवणारी मालमत्ता पत्रिका म्हणजे व्हर्टिकल प्रॉपर्टी कार्ड.
3. या योजनेचा किती सदनिकाधारकांना लाभ होणार आहे?
राज्यातील सुमारे ७ कोटींहून अधिक सदनिकाधारकांना या उपक्रमाचा लाभ होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.