Nagpur News : जीवाची भीती ,रस्त्यांवर काढली रात्र ;जलशुद्धीकरणात क्लोरीन वायू गळती

Nagpur News : गोधनी नगरपंचायतीतीतील फागोजी ले-आऊटमधील जलशुद्धीकरण केंद्रात रविवार व सोमवारच्या मध्यरात्री क्लोरीन वायू गळती झाल्याने एकच दहशत पसरली. जीवाच्या भितीपोटी परिसरातील शेकडो नागरिकांनी घराला कुलूप ठोकून सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. विशेष म्हणजे, अनेकांनी संपुर्ण रात्र रस्त्यांवर जागून काढली.
फोटो सौजन्य AI
फोटो सौजन्य AI
Published on: 
Updated on: 
  • भोपाळ वायू दुर्घटनेची आठवण
  • रस्त्याकडे पळत सुटलो
  • रूबीचा गेला जीव
  • तरुणांनी दाखवले धाडस

Nagpur News :  मध्यरात्री सव्वा बारानंतर विषारी वायुगळतीचा अंदाज सर्वांनी व्यक्त केला. त्यानंतर काहीच मिनीटांत त्याचा त्रास जलशुध्दीकरण केंद्राला लागून असलेल्या फागोजी लेआऊटमधील रहिवाश्यांना झाला. या लेआउटमध्ये अंदाजे २०० च्या आसपास नागरिक राहतात.

या घटनेचा 'आँखो देखा हाल' सांगताना फागोजी ले-आऊटमधील रहिवासी सुरती भट म्हणाल्या, 'रात्री जेवणानंतर घरातील बहुतांश मंडळी झोपी गेलो होतो.

मात्र, मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास अचानक मुलाला क्लोरीनचा वास येऊ लागला. त्याला डोळ्यात जळजळ, श्वास घ्यायला त्रास व उलट्‌या होऊ लागल्या. त्याने सर्वांना झोपेतून उठविले. लगेच काही वेळात आजूबाजूला आरडाओरड सुरू झाल्याचा आवाज आला. आम्ही लगेच दारे-खिडक्या बंद केल्या व तेवढ्या रात्री मुख्य दाराला कुलूप लावून सुरक्षित स्थळी गेलो .

जवळपास कुणीही नातेवाईक नसल्यामुळे नातवासह आम्ही सर्वांनी उघड्यावर रस्त्यावरच रात्र जागून काढली. मला आधीच किडनीचा त्रास आहे. त्यात दम कोंडल्यासारखे वाटल्याने जीव घाबरत होता. सोमवारी दुपारी ११.३० च्या सुमारास परिस्थिती साधारण

झाल्यानंतर आम्ही सर्व जण घरी परतलो. परंतु, अद्यापही त्रास सुरूच आहे' असे भट यांनी सांगितले.

भोपाळ वायू दुर्घटनेची आठवण

भोपाळमध्ये काही दशकांपूर्वी झालेल्या विषारी वायुगळतीने अनेकांचे जीव गेले, गोधनीत झालेल्या या घटनेनंतरही अनेकांना भोपाळ वायुगळतीची आठवण झाली. मात्र, गोधनीतील घटना ही कमी तिव्रतेची व तातडीने सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्याने नियंत्रणात राहीली, वेळीच पाण्याचा मारा शिवाय निसर्गानेही पावसाच्या रूपात मदत केल्याने वायुगळती वैगात पसरण्यावर मयाँदा आल्या.

रस्त्याकडे पळत सुटलो

या लेआऊटमधील अनेकांना झाला. सरस्वती सरोदे यांनीही घडलेल्या घटनेबाबत माहिती दिली, त्या म्हणाल्या, मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास श्वसनाचा त्रास व डोळ्यात मिरची गेल्याप्रमाणे वाटू लागल्याने घरातील सर्व जण गोधनी रोडकडे पळत सुटलो. रस्त्यावर दोन-तीन तास काढल्यानंतर प्रभाव कमी झाल्यानंतर पहाटे साडेचार वाजता घरी परतलो.

रूबीचा गेला जीव

वायूगळतीमुळे फागोजी ले-आऊट परिसरात राहणाऱ्या राजू ढोणे यांना चांगलाच फटका बसला. या दुर्घटनेत त्याचा लाडका 'रुबी' नावाचा पांढऱ्या रंगाचा पाळीव कुत्रा मरण पावला. घरातील अन्य सदस्यांना वेळीच रुग्णालयात भरती करण्यात आले.

तरुणांनी दाखवले धाडस

परिसरातील सुरेश सूर्यवंशी, आकाश कोलते, कार्तिक लक्षणे, गौरव लक्षणे, महेश यादव, स्वराज येलेकर व परिसरातील अन्य तरुणांनी धाडस व तत्परता दाखवून झोपेत असलेल्या फागोजी ले-आऊट व आजूबाजूच्या असंख्य नागरिकांना खासगी वाहनांनी सुरक्षितस्थळी हलविले, तसेच गंभीर अवस्थेत असलेल्यांना जवळच्या खासगी रुग्णालयांमध्ये भरती केले. त्यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या तरूणांनी वेळीच नागरिकांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला, घर व सामानाची चिंता करू नका, आधी जीव महत्वाचा असल्याचे सांगत धीर दिला.