नालासोपाऱ्यात दोन गटांत हाणामारी ( सौजन्य - Chatgpt )
अचोळे भागात नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम सुरू असताना एका अरुंद रस्त्यावरून दुचाकीस्वार आणि टेम्पो चालकामध्ये बाचाबाची झाली रस्त्यावर गर्दी आणि जागेचा अभाव असल्याने हा वाद अधिक वाढला. त्यावेळी मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मध्यस्थी करत दुचाकीस्वाराला मारहाण करून तेथून हाकलून लावल्याचा आरोप आहे. या अपमानाचा बदला घेण्यासाठी संबंधित दुचाकीस्वार काही वेळातच आपल्या समर्थकांसह घटनास्थळी परत आला.
दोन्ही गटांमध्ये जोरदार राडा सुरू झाला. हल्लेखोरांनी काठ्या, बांबू आणि दगडांच्या साहाय्याने मंडळाच्या कार्यकर्त्यांवर आणि उपस्थितांवर हल्ला चढवला. या संघर्षात अनेक नागरिक जखमी झाले. जखमींना तातडीने वसई-विरार महापालिकेच्या तुळींज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. याप्रकरणी तुळींज पोलिसांनी उशिरा रात्री हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेबाबत दोन्ही बाजूंकडून परस्परविरोधी दावे केले जात आहेत. जखमी मंडळ सदस्य विशाल सिंग यांनी आरोप केला की, कृष्णा नावाच्या दुचाकीस्वाराने वाद घातल्यामुळे त्याला हटकण्यात आले होते. मात्र, तो १० ते १५ जणांना घेऊन आला आणि त्यांनी तुफान दगडफेक केली. या हल्ल्यात मंडळाच्या मूर्तीचेही नुकसान झाले. या हाणामारीत एका महिलेसह अनेक निष्पाप नागरिकही जखमी झाले आहेत.
दुसऱ्या बाजूने, दुचाकीस्वार कृष्णाचा मित्र शिव यादव याने सांगितले की, मंडळाने रस्त्यावर पुरेशी जागा सोडली नव्हती. रस्ता अरुंद असल्याने टेम्पो चालकाशी वाद झाला, ज्यामध्ये मंडळ सदस्यांनी कृष्णाला मारहाण केली. आम्ही केवळ याचा जाब विचारण्यासाठी तिथे गेलो होतो. नवरात्रीच्या सुरुवातीलाच घडलेल्या या हिंसक प्रकारामुळे परिसरात भीती पसरली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला आहे.






