

सुट्टीच्या दिवशीही महापालिकेचा बुलडोझर; ३.५८ लाख चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त
म्हात्रे पूल ते राजाराम पुलादरम्यान २.३९ लाख चौरस फूट जागा मोकळी
शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता, रविवार पेठेतही कारवाई
पुणे : शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागांवरील अतिक्रमणांविरोधात पुणे महापालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. शनिवारची (दि.२८) साप्ताहिक सुट्टी असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने शहराच्या विविध भागांत व्यापक मोहीम राबवली. या कारवाईत सायंकाळी सहा वाजेपर्यंत तब्बल ३ लाख ५८ हजार ७४० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
शहरातील सहा क्षेत्रीय कार्यालयांपैकी पाच कार्यालयांच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली, तर क्षेत्रीय कार्यालय क्रमांक एकच्या हद्दीत कोणतीही कारवाई झाली नाही. या मोहिमेत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहाच्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली. म्हात्रे पुलापासून राजाराम पुलापर्यंतच्या रस्त्यालगतची तब्बल २ लाख ३९ हजार ४८० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. याशिवाय शुक्रवार पेठ, बाजीराव रस्ता, केळकर रस्ता आणि रविवार पेठ या वर्दळीच्या भागांतही महापालिकेने अतिक्रमणांवर कारवाई केली.
रविवार पेठेत सायंकाळनंतरही ही मोहीम सुरू होती. सुट्टीच्या दिवशीही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रस्त्यावर उतरवून राबवण्यात आलेल्या या मोहिमेतून अतिक्रमणांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासन गंभीर असल्याचे स्पष्ट झाले आहे. शहरातील वाढत्या अतिक्रमणांमुळे रस्त्यांची रुंदी कमी होणे, पदपथांवरून पादचाऱ्यांना चालणे कठीण होणे आणि वाहतुकीला अडथळे निर्माण होणे, अशा तक्रारी सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक जागा अतिक्रमणमुक्त करण्यासाठी महापालिकेने आक्रमक पवित्रा घेतला आहे.
पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत कारवाई
महापालिका प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, क्षेत्रीय कार्यालयनिहाय कारवाईत क्षेत्रीय कार्यालय क्रमांक दोनच्या हद्दीतील कोंढवा बुद्रुक येथील सोमजी चौक आणि आआंबेडकरनगर परिसरात ३७ हजार ३०० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय क्रमांक तीनच्या हद्दीतील सुस-नांदे मुख्य रस्त्यावर ४१ हजार ५०० चौरस फूट जागेवरील अतिक्रमणे हटवण्यात आली. क्षेत्रीय कार्यालय क्रमांक चारच्या हद्दीतील बी. टी. कवडे रस्ता, घोरपडी परिसर आणि मुंढवा चौक येथे ३५ हजार ५०० चौरस फूट जागा मोकळी करण्यात आली.
शुक्रवार पेठेतही कारवाई
क्षेत्रीय कार्यालय क्रमांक पाचच्या हद्दीतील शुक्रवार पेठेतील बाजीराव रस्ता आणि केळकर रस्त्यावर ३ हजार ५०० चौरस फूट जागेवरील अतिक्रमणे हटविण्यात आली. त्यानंतर रविवार पेठेतही मोहीम राबवून १ हजार ४६० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली. या परिसरातील कारवाई सायंकाळपर्यंत सुरू असल्याने हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता होती. दरम्यान, क्षेत्रीय कार्यालय क्रमांक सहाच्या हद्दीत म्हात्रे पूल ते राजाराम पूल या रस्त्यादरम्यान सर्वांत मोठी कारवाई करण्यात आली.
1. पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात किती जागा मोकळी केली?
महापालिकेच्या कारवाईत एकाच दिवसात ३ लाख ५८ हजार ७४० चौरस फूट जागा अतिक्रमणमुक्त करण्यात आली.
2. ही कारवाई कोणत्या दिवशी करण्यात आली?
शनिवार, दि. २८ रोजी साप्ताहिक सुट्टी असतानाही महापालिकेने अतिक्रमणविरोधी मोहीम राबवली.
3. सर्वाधिक कारवाई कोणत्या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत झाली?
क्षेत्रीय कार्यालय क्रमांक ६च्या हद्दीत सर्वाधिक कारवाई करण्यात आली.