गर्दीच्या ठिकाणी थांबून प्रवाशांचे मोबाईल चोरणारे जाळ्यात

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
Published on: 
Updated on: 

पुणे : शहरातील गर्दीच्या ठिकाणी थांबून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या टोळीतील दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट एकने सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तर, त्यांचा एक साथीदार पसार झाला आहे. मुकेश शिवलाल दिवाकर (वय २१, रा. खराडी) व दिपककुमार मोहन जयस्वाल (वय २३) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर, त्यांच्या साथीदाराचा शोध घेतला जात आहे.

शहरातील वाढत्या लुटमारीच्या आणि मोबाईल चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेला सूचना देण्यात आल्या आहेत. यादरम्यान, युनिट एकच्या पथकाला माहिती मिळाली की, शहरातील गर्दीच्या ठिकाणी मोबाईल चोर्या करणार्या टोळीतील दोघे मोबाईल विक्री करण्यासाठी खराडी येथे येणार आहेत. त्यानुसार, उपनिरीक्षक संजय गायकवाड व त्यांच्या पथकाने येथे सापळा रचला. त्यानंतर या दोघांना पकडण्यात आले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून दोन सॅमसंग, दोन रेडमी, दोन ओपो आणि दोन एमआय कंपनीचे एकूण ८ मोबाईल मिळून आले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी मोबाईल चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून चंदननगर पोलीस ठाण्यातील तीन, विश्रामबाग पोलीस ठाण्यातील एक असे चार गुन्हे उघडकीस आले आहेत. तर, उर्वरित मोबाईलबाबत तपास केला जात आहे.

ही कारवाई सहाय्यक आयुक्त गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक संजय गायकवाड, पोलीस अंमलदार अजय थोरात, इम्रान शेख, तुषार माळवदकर, महेश बामगुडे, मिना पिंजण व त्यांच्या पथकाने केली आहे.