रंगभूमी, चित्रपट आणि मालिका अशा तिन्ही माध्यमांवर अधिराज्य गाजविणारे ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांचं आज पुण्यात (Pune) दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar On Vikram Gokhale Death) यांनीदेखील फेसबुक पोस्टच्या माध्यमातून विक्रम गोखलेंच्या निधनाबद्दल हळहळ व्यक्त केली आहे.
नाना यांनी विक्रम गोखले यांच्याबरोबरचा एक छान फोटो शेअर केला आहे. या पोस्टमध्ये नाना यांनी लिहिले आहे, “विक्रम मी कायम तुझ्या समोर नतमस्तक होतो …..असेन…तुझ्यासारखा कलावंत आणि माणूस होणे नाही….”
[read_also content=”अभिनय करताना भूमिका जगणारा कलावंत आपल्यातून गेला, राज ठाकरेंनी विक्रम गोखलेंना वाहिली श्रद्धांजली https://www.navarashtra.com/maharashtra/raj-thackeray-condelence-message-about-vikram-gokhale-death-nrsr-348582/”]
नाना पाटेकर यांनी ‘नटसम्राट’ या चित्रपटात गणपतराव बेलवलकर ही अजरामर भूमिका साकारली होती. नटसम्राट नाटकावर आधारित या चित्रपटात नाना यांच्याबरोबर विक्रम गोखले यांची एक वेगळी भूमिकाही आपल्याला पाहायला मिळाली होती. जणू ही भूमिका खास चित्रपटासाठी आणि या २ नटांच्या दर्जेदार अभिनयासाठीच लिहिली गेली होती. या चित्रपटात विक्रम गोखले यांच्या भूमिकेचं खूप कौतुक झालं. विक्रम गोखले हे गोखले घराण्याच्या अभिनय परंपरेतील चौथ्या पिढीचे प्रतिनिधी होते. ज्येष्ठ अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेताना विक्रम गोखले यांनी सीमेवरील जवानांसाठी अर्थसहाय्य करण्याची परंपरा जीवनाच्या अखेरपर्यंत सुरू ठेवली. मनोरंजन क्षेत्रातील लोकांना अनेकदा ते मार्गदर्शन करायचे. अभिनयाचं एक चालत बोलतं विद्यापीठ अशी काहीशी विक्रम गोखले यांची प्रतिमा होती.
काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या गोदावरी या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांनी महत्वाची भूमिका साकारली. या चित्रपटामध्ये विक्रम गोखले यांच्याबरोबरच जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, अभिनेता संजय मोने यांनी देखील प्रमुख भूमिका साकारली आहे. याशिवाय ‘तुझेच मी गीत गात आहे’ या मालिकेत त्यांनी पंडीत मुकुल नारायण नारायण ही भूमिका साकारली होती. ही त्यांनी काम केलेली अखेरची मालिका होती.






