

फोनची विक्री 1 डिसेंबर 2027 पासून सुरु होणार
स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे
ग्राहकांना 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने भारतीय बाजारात Motorola Edge 70 Neo हा नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. एज निओ सिरीजअंतर्गत लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. हा स्मार्टफोन मिड-रेंज प्राईज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनची किंमत आणि त्याचे फीचर्स सविस्तर जाणून घेऊया.
मोटोरोला स्मार्टफोन 8GB+128GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या व्हेरिअंटची किंमत 40,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन पॅनटोन ग्रे लाइलॅक, पॅनटोन मिल्की ब्लू, पॅनटोन माउंटेन व्यू आणि पॅनटोन सेज या रंगांच्या पर्यायांत उपलब्ध आहे. लाँच ऑफरअंतर्गत कंपनी 10 दिवसापर्यंत 3 हजार रुपयांचे प्लॅट डिस्काऊंट देखील देत आहे.
बँक ऑफर्ससह फोनची किंमत 37,999 रुपये होणार आहे. इतकंच नाही तर निवडक बँक आणि क्रेडिट कार्डावर 3 हजार रुपयांचे कॅशबॅक देखील ऑफर केले जाणार आहे. ग्राहकांना 9 महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट ईएमआय पर्याय देखील मिळणार आहे. फोनची विक्री 1 डिसेंबर 2026 पासून सुरु होणार आहे. हा नवा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, मोटोरोलाची वेबसाईट आणि ऑफलाईन स्टोअर्सवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. (फोटो सौजन्य - मोटोरोला)
मोटोरोलाने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, यामध्ये 6.8 इंच अमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट देखील मिळणार आहे. डिस्प्लेची पीक ब्राइटनेस 5,200 निट्सपर्यंत जाऊ शकते. या फोनमध्ये वॉटर टच फीचर देखील मिळणार आहे. दमदार परफॉर्मंससाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 4nm प्रोसेसवर तयार करण्यात आलेला क्वालकॉमचा स्नॅपड्रॅगन 7एस जेन 3 प्रोसेसर मिळणार आहे.
कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 8GB एलपीडीडीआर5एक्स रॅम आणि 128GB यूएफएस 3.1 स्टोरेज मिळणार आहे. स्मार्टफोनचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने 1TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. यासोबतच यामध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित Hello UI मिळणार आहे. कंपनी या स्मार्टफोनच्या खरेदीवर 3 वर्षांचे ओएस अपडेट आणि 5 वर्षांचे सुरक्षा अपडेट देखील देणार आहे.
स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये 50MP चा सोनी LYTIA 710 प्रायमरी कॅमेरा मिळणार आहे, ज्यामध्ये OIS सपोर्ट देखील आहे. यासोबतच स्मार्टफोनमध्ये 2MP चा मॅक्रो कॅमेरा देखील आहे. तर स्मार्टफोनच्या समोरील बाजूला सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे, जी 45W वायर्ड चार्जिंग सपोर्ट आणि 7.5W रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि बायपास चार्जिंग सपोर्टने सुसज्ज आहे.